मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज कोरोना परिस्थिचा आढावा घेण्यासाठी देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यासोबत बैठक बोलवली आहे. मात्र या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंऐवजी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे. मात्र या निर्णयामधील कारणाबद्दल कोणताही खुलासा मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलेला नाही.
पंतप्रधान मोदी आज दुपारी साडेचारच्या सुमारास सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. या बैठकीमध्ये महाराष्ट्र सरकारच्यावतीने मुख्यमंत्र्यांऐवजी राज्याचे आरोग्यमंत्री सहभागी होणार आहेत.
Prime Minister Narendra Modi will interact with the Chief Ministers of all states today at 4:30 pm via video conferencing on the COVID situation
(File pic) pic.twitter.com/a3RRwOclfz
— ANI (@ANI) January 13, 2022
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रकृतीच्या कारणास्तव मागील काही आठवड्यांपासून घरुनच काम करत आहेत. अनेक बैठकींना ते ऑनलाइन माध्यमातून घरुनच हजेरी लावत आहेत. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनालाही मुख्यमंत्री अनुपस्थित असल्याचा मुद्दा चांगलाच गाजला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली असून सध्या ते राज्याचा कारभार, महत्वाच्या आढावा बैठकींना घरुनच ऑनलाईन उपस्थिती लावतात.
दरम्यान, महाराष्ट्रासहीत १९ राज्यांमध्ये १० हजारहून अधिक ओमायक्रॉन कोरोना रुग्ण असून महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, केरळ आणि गुजरात या राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी बुधवारी दिली. यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
यामुळे सर्वच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या या बैठकीमधील केंद्र सरकारकडून कठोर निर्बंधांबद्दल चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. निर्बंध कठोर करण्यासंदर्भात चर्चा करुन त्याबद्दल महत्वाचा निर्णय आज संध्याकाळपर्यंत घेतला जाईल, असे म्हटले जात आहे.