Wednesday, May 21, 2025

महाराष्ट्रमहत्वाची बातमीरत्नागिरी

रत्नागिरी विमानतळासाठी होणार १८ एकर भूसंपादन

रत्नागिरी विमानतळासाठी होणार १८ एकर भूसंपादन

रत्नागिरी  : रत्नागिरी विमानतळाच्या विस्तारीकरण आणि खासगी विमान वाहतुकीच्या दृष्टीने सुरू असलेल्या कामाला गती मिळाली आहे. यासाठी तालुक्यातील तिवंडेवाडीतील सुमारे १८.६८७ एकर खासगी जमीन संपादित करण्यात येणार आहे. त्यासाठीची अधिसूचना सोमवारी जाहीर करण्यात आली.


यामध्ये रत्नागिरी विमानतळ येथे डॉप्लर व्हेरी फ्रिक्वेंन्सी ओम्री डायरेक्शनल रेडिओ रेंज ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार असून विमानतळासाठी आवश्यक पॅरॉलल टॅक्सी ट्रॅक निर्माण करण्यात येणार आहे. येणाऱ्या विमानाला तत्काळ धावपट्टी रिकामी करून देण्यास त्याचा फायदा होणार आहे. संस्थापित नेविगेशनला या उपकरणामुळे विमानांशी हवाई संपर्क साधता येणार आहे.


रत्नागिरी विमानतळ काही वर्षे तटरक्षक दलाच्या ताब्यात आहे. सागरी किनापट्टीच्या सुरक्षेसाठी गोवा ते मुंबई या दरम्यान मध्यवर्ती ठिकाण म्हणून रत्नागिरी जिल्ह्यात दलाचा तळ उभारण्यात आला आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा तळ अतिशय महत्त्वाचा आहे. काही वर्षांपासून त्याचे विस्तारीकरण सुरू आहे. धावपट्टीचे काम पूर्ण झाले असले तरी अनेक प्रश्न कायम आहेत.


मात्र काही अडचणी अजूनही कायम आहेत. दुसरे विमान आले तर धावपट्टी रिकामी असणे आवश्यक आहे. म्हणून विमान पार्किंगला मोठी जागा लागणार आहे. त्यासाठी तेथील चव्हाण यांची जमीन करारावर वापरण्यास घेण्याची मागणी करण्यात आली होती. त्याची प्रक्रिया सुरू असताना आता जिल्हा प्रशासनाने तालुक्यातील तिवंडेवाडी येथील १८.६७८ एकर खासगी जमीन संपादित करण्याची अधिसूचना जारी केली आहे. बाधित क्षेत्रात निवासी जागांचा अंतर्भाव होत नाही म्हणून बाधित कुटुंबाच्या विस्थापनाचा व पुनर्वसनाचा प्रश्न येथे उद्भवणार नाही.




पर्यटन, उद्योगांना प्रोत्साहन



प्रवासी वाहतुकीसाठी विमानतळ रिजनल कनेक्टीव्हिटी स्कीम (आरसीएस) योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आले आहे. यामुळे एकंदरच पर्यटन, उद्योग व विमान वाहतूक यांना प्रोत्साहन मिळून रत्नागिरीत विकासाच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत.

Comments
Add Comment