पालघर: जिल्हा परिषद अध्यक्षा वैदेही वाढाण यांनी ग्रामीण भागातील शाळांना भेटी देऊन पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी वसई तालुक्यातील मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालागत असलेल्या कोली-चिंचोटी येथील जिल्हा परिषदेच्या शाळांना भेट देऊन पाहणी केली.
यावेळी वाढाण यांनी शाळेला भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेतल्या. कोली-चिंचोटी शाळेत एकूण २८६ विद्यार्थी शिकत असून केवळ ६ शिक्षक आहेत.
केवळ तीन वर्गखोल्या असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना अडचण निर्माण होत आहे. वाढाण यांनी याची दखल घेतानाच नवीन इमारती साठीजागा उपलब्ध नसल्याने जुन्या शाळा इमारतीच्या जागीच नवीन इमारत घेणे आवश्यक असल्याने कार्यकारी अभियंता (स.शि.अ.) यांना इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना यावेळी वैदेही वाढाण यांनी दिल्या. तसेच शाळेतील पोषण आहाराची पाहणी करून कोरोना प्रतिबंध पाळून आहार वाटपाच्या सूचना दिल्या.
यावेळी जि.प. सदस्य कृष्णा माळी, माजी सभापती महिला व बालकल्याण नमिता राऊत, प्र. उप शिक्षणाधिकारी जनाथे, प्र. कार्यकारी अभियंता शिंदे, गटशिक्षणाधिकारी वसई दवणे व इतर उपस्थित होते. जिल्हा परिषद अध्यक्षा वाढाण यांच्या या दौऱ्याचे स्वागत होत असून त्यांनी जिल्ह्यातील अतिग्रामीण भागातील शाळांना भेटी देऊन पाहणी करावी,अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.