सुकृत खांडेकर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आंदोलकांनी रोखल्यामुळे फिरोजपूरला जाणाऱ्या महामार्गावरील उड्डाण पुलावर थांबावे लागले आणि तेथूनच दिल्लीला माघारी परतावे लागले. देशाच्या पंचाहत्तर वर्षांच्या इतिहासात कोणत्याही पंतप्रधानांवर अशी पाळी आली नव्हती. पंजाबात काँग्रेसचे सरकार आहे. देशपातळीवर काँग्रेसचे भाजपशी हाडवैर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अफाट लोकप्रियतेबद्दल काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाला नफरत आहे. काँग्रेसचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांचे पंतप्रधानांच्या पंजाब भेटीच्या काळातील वर्तन बघितले, तर तेच या घटनेचे खलनायक आहेत, असे म्हणावे लागेल. शेतकरी आंदोलनाची ढाल पुढे करून चन्नी यांनी पंतप्रधानांवर सूड उगविण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस हायकमांडला खूश करण्यासाठी पंतप्रधानांना परत पाठवण्याचा पराक्रम केला, असे चन्नींना वाटत असेल, तर ते आणखी गंभीर आहे.
पंतप्रधान जेथे जातात, तेथे त्या राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे मुख्य सचिव व राज्याचे पोलीस महासंचालक त्यांचे स्वागत करतात, हा राजशिष्टाचार आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी जो प्रयोग केला, त्याचेच अनुकरण चन्नी यांनी पंजाबमध्ये केले. काही कारणाने मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या स्वागताला आले नाहीत, तर निदान मुख्य सचिव व पोलीस महासंचालक यांची उपस्थिती अत्यावश्यक होती. पण या तिघांपैकी कोणीही पंतप्रधान मोदींच्या स्वागताला फिरकले नाहीत. पंतप्रधानांच्या समवेत शासकीय गाड्यांचा ताफा असला, तरी त्यात कोणीही उच्चपदस्थ हजर नव्हते, ही जणू पंतप्रधानांवर येणाऱ्या संकटाची इशारा घंटा होती. राज्याचा प्रमुख, प्रशासनाचा प्रमुख आणि पोलीस प्रमुख या तिघांची गैरहजेरी पंतप्रधानांच्या जीवावर येणाऱ्या संकटाची पूर्वसूचना होती का?
पंतप्रधान ज्या मार्गावरून जाणार असतात, तो मार्ग सॅनेटाईझ केला जातो. त्याची माहिती केवळ स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (एसपीजी) आणि राज्य पोलिसांनाच असते. सुरक्षाव्यवस्था पूर्ण झाल्यावरच पोलिसांकडून पंतप्रधानांच्या ताफ्याला हिरवा कंदील दाखवला जातो. मग पंतप्रधान मोगा-फिरोजपूर हायवरून मोटारीने जाणार ही माहिती आंदोलकाना कशी समजली? उड्डाण पुलावर अशा ठिकाणी पंतप्रधानांची मोटार थांबवली गेली की, तेथे दुसरीकडे वळायला जागाच नव्हती. फ्लाय ओव्हरवर पंतप्रधानांच्या ताफ्याला घेरले गेले होते, हे षडयंत्र कोणी रचले? ज्या रस्त्यावर अगोदर कोणी नव्हते, तेथे पंतप्रधानांच्या मोटारी येतात, असे कळल्यावर शेकडो लोक बॅनर्स घेऊन व घोषणा देत कसे जमले?
खराब हवामान व पाऊस यामुळे भटिंडा विमानतळावरून पंतप्रधानांचे हेलिकॅाप्टर उडू शकणार नव्हते म्हणून फिरोजपूरकडे मोटारीने जाण्याचे ठरले. हुसेनीवाला येथील शहिदांच्या राष्ट्रीय स्मारकाला वंदन करण्यासाठी ते निघाले होते. ज्या रस्त्याने पंतप्रधान जाणार तो रस्ता पूर्ण मोकळा ठेवण्याची जबाबदारी पंजाब पोलिसांची होती. त्या मार्गावर कोणताही धोका वा संकट निर्माण होणार नाही, याची खबरदारी घेणे, हे पंजाब पोलिसांचे कामच होते. अचानक काही उद्भवले, तर पर्यायी मार्गही तयार ठेवणे, हे काम पंजाब पोलिसांचे होते. पण पंतप्रधानांना सुरक्षा देण्यात पोलीस प्रशासन संपूर्ण अपयशी ठरले.
उड्डाणपुलावर पंतप्रधानांचा ताफा वीस मिनिटे एकाच जागी थांबलेला होता. या काळात पोलीस महासंचालक, राज्याचे मुख्य सचिव आणि मुख्यमंत्री चन्नी कुठे होते? चन्नी किंवा पोलीस महासंचालक हे फोन घेत नव्हते. या काळात आंदोलकांचा जमाव पंतप्रधानांच्या ताफ्यावर चाल करून आला असता तर? पंतप्रधानांच्या दिशेने कोणी सुईसाइड बाॅम्बर घुसला असता तर? पाकिस्तानची सरहद्द वीस किमीवर असताना तेथून थेट गोळीबार झाला असता तर? पंतप्रधानांच्या ताफ्यावर ड्रोनमधून हल्ला झाला असता तर? काय वाट्टेल ते होऊ शकले असते! पंतप्रधान माघारी फिरल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी ‘हाऊज द जोश…’ असे ट्वीट केले, याचा अर्थ पंजाबमधील कारस्थानाची आखणी दिल्लीत झाली होती का?
गेल्या काही वर्षांत नरेंद्र मोदींची देश-विदेशातील प्रतिमा खूपच उंचावली आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व, कार्यपद्धती, त्यांचे कर्तृत्व यातून त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा विजयी रथ चौफेर दौडत आहे. देशावर साठ दशके सत्ता उपभोगणाऱ्या काँग्रेसला मोदींची लोकप्रियता हा सर्वात मोठा अडथळा आहे. पाकिस्तानच्या हद्दीत घुसून भारतीय हवाई दलाने पुलवामाचा बदला घेतला, जम्मू-काश्मीरला दिलेल्या ३७०व्या कलमाचा विशेष दर्जा काढून घेतला, जम्मू-काश्मीरचे विभाजन केले, तलाक कायदा रद्द केला, राम मंदिराची उभारणी सुरू झाली, घुसखोरांना रोखण्यासाठी सीएए कायदा झाला, मोदींचा हा सारा अजेंडा विरोधी पक्षांच्या मुळावर येतो आहे. म्हणूनच मोदी द्वेषाचा ज्वर विरोधकांना चढला आहे. मोदींवर वाट्टेल ते आरोप करणे, चिखलफेक करणे, त्यांच्यावर असभ्य भाषेत टीकाटिप्पणी करणे हे विरोधी पक्षांकडून रोज घडत आहे. राजकारणात ही गलिच्छ व असभ्य संस्कृती एकवेळ दुर्लक्ष करता येईल, पण त्यांच्या जीवाला धोका निर्माण होईल, असे संकट निर्माण करणे हे देशद्रोहापेक्षा वेगळे कसे असू शकते? पंजाब प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुनील जाखड यांनी स्वतः म्हटले आहे की, जे घडले ते कधीच मान्य होणार नाही, पंजाबच्या अस्मितेच्या ते विरोधात आहे.
केंद्र सरकारने शेतकरी हितासाठी केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांना कोणी भडकावले? त्यांच्या मनात मोदी सरकारविरोधात विष कोणी पेरले? दिल्लीच्या सीमेवर वर्षभर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना रोज खुराक आणि साधनसामग्री कोणी पुरवली? मोदी हे शेतकरीविरोधी आहेत, हे आंदोलकांच्या मनात कोणी ठसवले? पंतप्रधानांना पंजाबमध्ये रस्त्यात रोखले गेले, याचा आनंद त्यांना झाला असावा. मोदी हे एका पक्षाचे नेते नाहीत, तर देशाचे पंतप्रधान आहेत. देशातील जनतेने त्यांना सलग दुसऱ्यांदा सत्ता दिली, हे काँग्रेसला अजूनही पचनी पडलेले नाही. पंजाबचे मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांच्याकडून पंतप्रधानांच्या सुरक्षितेत झालेला हलगर्जीपणा हा अक्षम्य अपराध आहे. पंजाबची प्रतिमा डागाळलीच. पण पंजाबच्या नेतृत्वाला देशातील आम जनतेचा तळतळाट लाभला आहे.
गेल्या चार महिन्यांत पंजाबमध्ये लुधियाना, पठाणकोट, अमृतसर, फिरोजपूरमध्ये बाॅम्बस्फोटांच्या घटना घडल्या. राज्यात सहा वेळा हायअलर्ट जारी झाला. ५ तारखेला पंतप्रधान पंजाबमध्ये येणार आहेत, ते शेतकरीविरोधी आहेत, त्यांचा निषेध करा, त्यांना जोडे दाखवा, इंदिरा गांधींचे काय झाले, ठाऊक आहे ना? असे खलिस्तानवाद्यांचे व्हीडिओ दोन दिवस अगोदरपासून सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तरीही
चन्नी सरकारला पंतप्रधानांच्या सुरक्षिततेची काटेकोर दक्षता घ्यावीशी वाटली नाही, हे दुर्दैव म्हणायचे
की देशद्रोह?
[email protected]