नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांत कोरोनाच्या आढळून आलेल्या नवीन रुग्णांची संख्या आता २ लाखाच्या जवळ आहे. गेल्या २४ तासांत देशात १ लाख ९४ हजार ७२० इतके कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून आले आहेत. ही संख्या कालच्या तुलनेत १५.८ टक्क्यांनी अधिक आहे. कोरोना मृत्युंची संख्याही वाढली आहे. गेल्या २४ तासांत ४४२ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. दुसरीकडे, महाराष्ट्रात सरकारी रुग्णालयांमधील ४८१ डॉक्टरांना कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली.
देशात काल कोरोनाच्या रुग्णांची संख्या १ लाख ६८ हजार ०६३ इतकी होती. ही संख्या सोमवारच्या तुलनेत १२ हजारांनी कमी होती. पण आज कोरोनाच्या नवीन रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ दिसून आली असून ती २ लाखाच्या जवळ गेली आहे. रुग्णसंख्या इतक्याच वेगाने वाढत राहिल्यास २ लाखाचा आकडाही ओलांडला जाऊ शकतो. कालच्या तुलनेत देशात आज २६ हजार ६५७ इतके अधिक नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
दरम्यान, देशात ओमायक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या ही ४,८६८ इतकी झाली आहे. यातील अनेक रुग्ण बरेही झाले आहेत.