
वाडा : सन २०२१ - २२ पाचवी इयत्तेच्या शिष्यवृत्ती परिक्षेमध्ये ज्ञानरचना इंग्लिश मीडियम स्कूल, चिंचघरच्या विद्यार्थ्यांनी मोठे यश मिळवले असून पहिल्याच वर्षी या शाळेचे सहा विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत.
शाळेचा आनंद मस्तराम बरूड हा विद्यार्थी राष्ट्रीय ग्रामीण स्कॉलरशिपमध्ये बारावा आला तर ज्योती तुषार मिसाळ, निओ धीरज अधिकारी, सार्थक महेश आरज, किमया किरण पाटील आणि यश दिनेश धिंडा या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. कोविडची परिस्थिती असतानाही ऑनलाईन तसेच ऑफलाईन वर्ग घेवून मुख्याध्यापिका अंजली अनंता पाटील, दिव्या दत्तात्रेय भोईर, वैशाली विलास कोथे, माया दत्तात्रेय भोईर आणि सचिन मुकुंद पवार या शिक्षकांनी मेहनत घेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
शाळेच्या विद्यार्थ्यांनी अनेक अडचणींवर मात करून मिळवलेले यश आमच्यासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे, भविष्यात याचा नक्कीच वटवृक्ष होईल, अशी प्रतिक्रिया मुख्याध्यापिका अंजली पाटील यांनी व्यक्त केली आहे.