
रत्नागिरी : पर्ससीन मासेमारीला बंदी असताना जिल्ह्यात काही बोटी खुलेआमपणे पर्ससीन मासेमारी करत असून अशांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. याकडे अधिकाऱ्यांसह प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार होत असल्याचे समोर येत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील पर्ससीन मच्छीमारी सुरू व्हावी म्हणून मच्छीमारांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. सागराच्या सुरक्षिततेसाठी कोस्टकार्ड, पोलीस आणि मत्स्य विभाग यांचा जागता पाहारा असतो. त्यासाठी शासन करोडो रुपये खर्च करत असते. परंतु आपल्या जॉबच्या बाहेर जाऊन कोणतेही कार्य करणार नाही, असा अलिखित नियम हे अधिकारी बजावतात की काय, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. पर्ससीन मच्छीमारी केल्यानंतर मोठ्या प्रमाणात सर्व प्रकारची मच्छीमारी संकटात येते म्हणूनच या मच्छीमारीला विरोध केला जात आहे; परंतु शासनाची धूळफेक करत मोठ्या प्रमाणात पर्ससीन मच्छीमारी सुरू असून यावर कारवाई करणे गरजेचे आहे.