Tuesday, July 23, 2024
Homeताज्या घडामोडीबूस्टर डोसची शिफारस कोणीही केलेली नाही

बूस्टर डोसची शिफारस कोणीही केलेली नाही

ओमायक्रॉनची लागण सर्वांनाच होणार, बूस्टर डोसही संसर्ग थांबवू शकणार नाही; आरोग्य तज्ज्ञांची माहिती

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भारतात पुन्हा कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. तर, कोरोनाचा नवीन प्रकार ओमायक्रॉन ज्यामुळे अनेक देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढले, त्याचा संसर्गही देशात वाढतोय. त्यामुळे सरकारने खबरदारीची पावले उचलत १५-१८ वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला. शिवाय आरोग्य कर्मचारी, पहिल्या फळीतील कर्मचारी आणि ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या लोकांना लसीचा बूस्टर देण्याची घोषणा केली. मात्र, हा बूस्टर डोस देखील लोकांना ओमायक्रॉनची लागण होण्यापासून रोखू शकणार नाही, असे आयसीएमआरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजीमधील वैज्ञानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष जयप्रकाश मुलियील यांनी सांगितले.

‘ओमायक्रॉनचा फैलाव अत्यंत वेगाने होत आहे. या विषाणूला रोखणे शक्य नाही. जवळपास प्रत्येकाला ओमायक्रॉनची लागण होणार आहे. आता जी रुग्णसंख्या आपल्याला दिसते आहे त्यापेक्षा ९० टक्के जास्त रुग्ण प्रत्यक्षात असू शकतात. तरीही घाबरण्याचे कोणतेही कारण नाही’, असे डॉ. जयप्रकाश मुलियील यांनी नमूद केले.

मुलियील म्हणाले की, “कोरोना हा आता भयानक आजार राहिलेला नाही. नवीन स्ट्रेनचा प्रभाव खूपच कमी आहे आणि खूप कमी लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येत आहे. ओमायक्रॉन हा एक असा आजार आहे, ज्याचा आपण सामना करू शकतो. आपल्यापैकी अनेकांना याची लागण झाल्याचेही कळणार नाही. कदाचित ८० टक्क्यांहून अधिक लोकांना कळणारही नाही की आपल्याला कधी ओमायक्रॉनची लागण झाली,” असे त्यांनी सांगितले.

कोणत्याही वैद्यकीय समितीने बूस्टर डोसची शिफारस केलेली नाही, असे सांगून डॉ. मुलीयल म्हणाले, कोविडवरील लस पुन्हा पुन्हा बूस्टर डोस म्हणून देण्यात काहीही अर्थ नाही. त्याऐवजी नव्या व्हेरिएंटला प्रतिबंध करू शकेल, अशा नव्या लसची निर्मिती होत असेल आणि ती लस दिली जाणार असेल तर ते अधिक योग्य ठरेल, असे मतही डॉ. मुलियील यांनी मांडले. कोणत्याही वैद्यकीय संस्थेने व सरकारच्या सल्लागारांनी बूस्टर डोस देण्याचा सल्ला दिलेला नाही. बूस्टर डोस महामारी रोखू शकत नाही हे वास्तव असून प्रीकॉशनरी डोस देण्याबाबत सरकारला सल्ला दिला गेलेला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे अशा वृद्ध व्यक्तींचा विचार करून हा सल्ला दिला गेला आहे, असेही ते म्हणाले.

सध्याची कोणतीही कोरोनाविरोधी लस या रोगाची नैसर्गिक प्रगती थांबवणार नाहीत. तसेच त्यांनी लक्षणे नसलेल्या बाधितांच्या जवळच्या लोकांच्या कोरोना चाचणीला विरोध केला आहे. त्यांच्यामते या विषाणूचा संसर्ग अवघ्या दोन दिवसांत दुप्पट होत आहे, त्यामुळे कोरोना चाचणीचा रिझल्ट येईपर्यंत बाधित व्यक्तीमुळे अनेक लोकं संक्रमित झाली असू शकतात. अशा परिस्थितीत चाचणी करण्याचा फायदा होणार नाही आणि त्यामुळे कोरोनाच्या फैलावात देखील काही फरक पडणार नाही, असे मुलियील म्हणतात.

कडक लॉकडाऊनबाबत ते म्हणाले की, “आपण जास्त काळ घरात कोंडून राहू शकत नाही. असेही ओमायक्रॉनचा प्रभाव डेल्टा प्रकारापेक्षा खूपच सौम्य आहे. शिवाय सुरुवातीला लस देशात येईपर्यंत सुमारे ८५ टक्के भारतीयांना संसर्ग झाला होता. अशा परिस्थितीत, लसीचा पहिला डोस हा पहिल्या बूस्टर डोससारखा होता कारण बहुतेक भारतीयांमध्ये नैसर्गिक रोग प्रतिकारशक्ती होती,” असे त्यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -