Sunday, July 21, 2024
Homeअध्यात्मनाम व भगवंत

नाम व भगवंत

ब्रह्मचैतन्य श्री गाेंदवलेकर महाराज

‘राम राम’ म्हणून राम कसा भेटेल हे विचारण्यात काहीच अर्थ नाही. उलट असे म्हणता येईल की, ‘राम राम’ म्हटल्याशिवाय राम भेटणेच शक्य नाही. व्यवहारातही आपला हाच अनुभव आहे. समजा, आपल्याला एका गावाला जायचे आहे म्हणून आपण स्टेशनवर गेलो आणि जिथे जायचे आहे, त्याचे सर्व वर्णन केले. पण नाव सांगता आले नाही, तर आपल्याला तिकीट मिळेल का? उलट, त्या गावातली माहिती काही नाही. पण नाव ठाऊक आहे, तर आपल्याला तिकीट मिळून तिथे जाता येईल. म्हणजे ठिकाण माहितीचे आहे, पण नाव तेवढेच न आठवले, तर काहीही उपयोग होत नाही. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, बाकी सर्व केले पण नाम नाही घेतले, तर काही उपयोग होत नाही म्हणून नाम घेणेच जरूर आहे. नामाने भगवंताची प्राप्ती होणार ही खात्री असावी.

भगवंताच्या नामाची गरज दोन तऱ्हेने आहे; एक प्रपंचाचे स्वरूप कळण्यासाठी आणि दुसरी, भगवंताच्या प्राप्तीसाठी. खायला-प्यायला पोटभर, बायको-मुले, घरदार वगैरे सर्व गोष्टी असल्या तरीसुद्धा आपल्याला काळजी आणि तळमळ का असते, हे आपल्याला कळत नाही. याचा अर्थ, दुःखाचे खरे स्थान कुठे आहे, हे कळत नाही. ते कळण्याकरिता भगवंताच्या नामाची गरज आहे. भगवंताची तळमळ लागेपर्यंत नामाची जरुरी आहे. नंतर भगवंतावाचून आपल्याला दुसरा आधार नाही म्हणून नाम घ्यायला पाहिजे आणि शेवटी, भगवंताच्या दर्शनानंतर नाम सवयीने आपोआप येते. एकूण आरंभापासून शेवटपर्यंत भगवंताचे नामच शिल्लक राहते. जो नामस्मरण करील आणि त्याचे अनुसंधान ठेवील त्याला भगवंताची जिज्ञासा आपोआप उत्पन्न होईल. नामाकरिता नाम घ्या की, त्यात राम आहे हे कळेल. नाम घेताना जे घडेल ते चांगले आणि आपल्या कल्याणाचे आहे, असा भरवसा ठेवा.

भगवंताचे नाम हीच सच्चिदानंदस्वरूप सद्-वस्तू होय. भगवंताच्या नामात जो स्वत:ला विसरला तो खरा जीवनमुक्त होय. जे काय साधायचे ते हेच. बाकीच्या गोष्टी स्वप्नासारख्या समजाव्यात. त्या प्रचितीस येतात पण नसतात. देहाशी असलेले आपले तादात्म्य हे एक प्रकारच्या सवयीने आणि अभ्यासानेच झाले आहे. याच्या उलट अभ्यास करून भगवंताचे चिंतन केले, तर जसे आज देहाशी तादात्म्य आहे, त्याचप्रमाणे भगवंताशी आपले तादात्म्य होईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -