Thursday, July 25, 2024
Homeदेशकोरोनावरील उपचारासाठी मोलनुपिरावीर नको

कोरोनावरील उपचारासाठी मोलनुपिरावीर नको

नवी दिल्ली : कोरोनाविरोधातील लढ्यात मोलनुपिरावीर या गोळीला भारतामध्ये आपत्कालीन स्थितीमध्ये मान्यता देण्यात आली होती. परंतु, मान्यता देऊन आठवडाही उलटला नाही तोच आता मोलनुपिरावीर परिणामकारक नाही उलट तिचे दुष्परिणाम जास्त असल्याने कोरोनावरील मानक उपचार पद्धतीत समावेश न करण्याचा निर्णय भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात आयसीएमआरच्या कोरोनाशी संबंधित राष्ट्रीय कृतिदलाने घेतला आहे.

देशाच्या औषधी नियामक मंडळ, भारतीय औषध महानियंत्रकाने अठ्ठावीस डिसेंबर रोजी मोलनुपिरावीरचा आपत्कालीन परिस्थितीत कोरोनावरील उपचारासाठी वापर करण्यास मंजुरी दिली होती. मोलनुपिरावीर ही एक अँटीव्हायरल गोळी आहे. कोरोना विषाणूचे उत्परिवर्तन रोखण्यास ती उपयुक्त असल्याचे आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे. मात्र आयसीएमआर या गोळीच्या वापराबाबत अनुकूल नाही.

या गोळीचा कोरोनावर उपचारासाठी फायदा होत नाही. उलट मोलनुपिरावीरचे साईडइफेक्ट होऊ शकतात. त्यामुळे या औषधीचा कोरोनावरील राष्ट्रीय उपचार दिशानिर्देशांमध्ये समावेश करण्याबाबत आयसीएमआर अनुकूल नाही.

आयसीएमआरचे संचालक डॉक्टर बलराम भार्गव यांनी गेल्या आठवड्यात मोलनुपिरावीरच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. जागतिक आरोग्य संघटना आणि ब्रिटनने देखील या गोळीचा कोविडवरील उपचारात वापर न करण्याचा निर्णय घेतला आहे. या औषधाचा गर्भातील भ्रूणावर विपरित परिणाम होऊ शकतो. ही गोळी घेतल्यानंतर तीन महिने तरी गर्भधारणा होऊ देऊ नये. कारण भ्रूणविकारामुळे जन्माला येणाऱ्या बाळात व्यंग असू शकते. मोलनुपिरावीरमुळे मांसपेशींचे नुकसान होण्याची शक्यता असते, असे भार्गव यांनी सांगितले होते.

दरम्यान, सौम्य ते प्रभावी कोविड संक्रमणा विरोधात मोलनुपिरावीरचा वापर होणार होता. या गोळीची किंमत 1,399 रुपये आहे. ही गोळी पाच दिवसांच्या कोर्स साठी तयार करण्यात आलेली आहे. कोरोना संक्रमणा विरोधात आतापर्यंतचे हे सर्वात स्वस्त औषध मानले जात आहे. 800 ग्रॅमची ही गोळी दिवसातून दोन वेळा पाच दिवसांसाठी घ्यावी लागते. आतापर्यंत कोरोनाविरोधातील संशोधनात शास्त्रज्ञांनी आणि संशोधकांनी खूप मोठी मजल मारली असून अनेक औषधी कंपन्यांच्या लस बाजारात उपलब्ध आहेत. तर काही औषधी कंपन्या कोरोना विरोधात गोळी अथवा द्रवरूपात औषध तयार करून तोंडावाटे त्याचा वापर वाढवण्यावर भर दिला आहे. या कंपन्यांमध्ये Hetro, Sun Pharma, Natco, Dr Reddy या कंपन्यांचा समावेश आहे. तोंडावाटे औषध तयार करण्याची जबाबदारी या कंपन्यांनी पेलली आहे. Merck या कंपनीने त्यांची सहभागीदार Ridgeback सोबत तोंडावाटे औषध तयार करण्याच्या प्रक्रियेला गती दिली असून लवकरच या कंपन्यांचे औषध बाजारात उपलब्ध होईल 1500 ते 2500 रुपये यादरम्यान या संपूर्ण औषध किटची किंमत असेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -