नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने केंद्र सरकारने राज्यांना पुन्हा पत्र पाठवून सतर्क केले आहे. राज्यांनी आपल्याकडे ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा, अशी सूचना केंद्राने राज्यांना केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे. पुरेसा मेडिकल ऑक्सिजन उपलब्ध राहील, याची काळजी राज्यांनी घ्यावी. यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी सूचना त्यांनी राज्यांच्या मुख्य सचिवांना केली आहे.
देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशात आज २ लाखाच्या जवळ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. देशात गेल्या २४ तासांत १ लाख ९४ हजार ७२० नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर गेल्या २४ तासांत ४४२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारच्या तुलनेत आज २६ हजार ६५७ इतके अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत.
केंद्राने राज्यांना खालील निर्देश दिले आहेत…
– रुग्णांची काळजी घेणाऱ्या सर्व आरोग्य सुविधा सज्ज ठेवा आणि किमान ४८ तास वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरेसा बफर स्टॉक उपलब्ध ठेवा.
– सर्व आरोग्य सुविधांमध्ये लिक्वीड वैद्यकीय ऑक्सिजन टाक्या पुरेशा प्रमाणात भरलेल्या हव्यात. रिफिलिंग टँकर्सचा अखंड पुरवठा असावा.
– सर्व पीएसए प्लांट पूर्ण कार्यक्षमतेने चालण्याच्या स्थितीत असावेत, प्लांटच्या देखभालीसाठी सर्व आवश्यक पावले उचलली जावीत.
– सर्व आरोग्य केंद्रांवर पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन सिलिंडर असावेत. ऑक्सिजन सिलेंडरमध्ये बॅकअप स्टॉक आणि मजबूत रिफिल सिस्टम असणे आवश्यक आहे.
– उच्च दर्जाच्या रुग्णालयांमध्ये लाइफ सपोर्ट उपकरणे उपलब्ध असावीत.
– ऑक्सिजन नियंत्रण कक्ष पुन्हा सुरू करावेत.