मुंबई : मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे ८ ते ३० नोव्हेंबर कालावधीत मधुमेह जागरूकता अभियानांतर्गत १,३३६ शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात एक लाखाहून अधिक नागरिकांची मधुमेह तपासणी करण्यात आली. त्यातील आकडेवारीनुसार संशयित मधुमेहींची संख्या ९ हजार २३१ इतकी आहे. तर हे प्रमाण तपासणी करण्यात आलेल्या व्यक्तीच्या ८ टक्के आहे.
मुंबई महापालिकेने मुंबई क्षेत्रातील ३० वर्षांवरील एकूण १ लाख ८ हजार ६८४ व्यक्तींची मधुमेह चाचणी केली. या चाचणीत मधुमेह संशयित आढळून आलेल्या व्यक्तींची संख्या ९ हजार २३१ एवढी आहे. या संशयित व्यक्तींचे पाठपुरावे करून निदान करण्यात आलेल्या रुग्णांची संख्या ही एकूण संशयितांच्या २६ टक्के आहे. म्हणजेच नवीन निदान झालेल्या मधुमेह रुग्णांची संख्या २ हजार ४१५ इतकि आहे. याव्यतिरिक्त तपासणी करण्यात आलेल्या मधुमेह संशयित व्यक्तींपैकी मधुमेह पूर्वता असणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण हे एकूण संशयितांच्या २० टक्के इतके म्हणजेच १८८९ इतकी असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य खात्याच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली आहे.
तसेच निदान झालेल्या व्यक्तींना आहार व जीवनशैलीतील बदलांविषयक समुपदेशन करण्यात आले असून त्यांना नियमितपणे मधुमेह तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर जीवनशैलीतील सकारात्मक बदल आत्मसात केल्यास मधुमेहाच्या सीमारेषेवर असणाऱ्या व्यक्तींमध्ये अर्थात ‘मधुमेह पूर्वता’ असणाऱ्यांमध्ये मधुमेह होण्याचे प्रमाण बऱ्याच अंशी टाळता येईल. तसेच मधुमेही रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित औषधोपचारांनी रक्तातील शर्करेचे प्रमाण नियंत्रित ठेवल्यास मधुमेहामुळे होणाऱ्या गुंतागुंतींचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असे आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी म्हटले आहे.