रत्नागिरी :देशभरात सुरू असलेला ओमायक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणेकडून कोरोना लसीकरणाला प्राधान्य दिले आहे. शासनाने १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू केले असून जिल्ह्यात आतापर्यंत ७१ हजारांपैकी २० हजार ७६६ जणांना लस दिली आहे. आतापर्यंत तीस टक्के जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. लसीकरण झाल्यामुळे कोरोना बाधितांमध्ये गंभीर रुग्णांची संख्या कमी आहे. ऑक्सीजनवरील आणि अतिदक्षता विभागातील बाधितांचा आकडा एक आकडीच आहे. त्यामुळे लसीकरणाच्या दोन मात्रा शंभर टक्के नागरिकांनी घेण्यावर भर देण्यात आला आहे. साडेदहा लाखांपैकी ७ लाख २८ हजार ७१० जणांनी दोन मात्रा घेतल्या आहेत. केंद्र शासनाकडून १५ ते १८ वयोगातील मुलांसाठी लसीकरण सुरू केले आहे. आठवड्यातून बुधवारी आणि शनिवारी या वयोगटातील लाभार्थींना लस दिली जाते. नियमित केंद्रांबरोबरच शाळा, महाविद्यालयांमध्येही लसीकरणाची व्यवस्था केली आहे. शनिवारी सात हजार मुलांना लस देण्यात आली. जिल्ह्यात या वयोगटातील सुमारे ७१ हजार लाभार्थी आहेत. आतापर्यंत २० हजार ७६६ जणांना पहिला डोस देण्यात आला आहे.
लस घेतल्यानंतर कोणताही त्रास झाल्याच्या नोंदी आरोग्य विभागाकडे नाहीत. २००७ मध्ये जन्म झालेली मुले या लसीकरणासाठी पात्र ठरत आहेत. हा वर्ग सुरक्षीत करण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून जोरदार प्रयत्न सुरु असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुध्द आठल्ये यांनी सांगितले.