Sunday, July 21, 2024
Homeदेशसहा राफेल विमाने लवकरच हवाईदलात होणार दाखल

सहा राफेल विमाने लवकरच हवाईदलात होणार दाखल

शेवटची तीन आणखी अत्याधुनिक

नवी दिल्ली :सर्वात अत्याधुनिक मध्यम वजनाची सहा लढाऊ राफेल विमाने लवकरच हवाई दलाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. फ्रान्स देशाचे तंत्रज्ञान असलेल्या राफेल लढाऊ विमानांचा ताफा येत्या एप्रिल महिन्यात पूर्णत्वास जाणार आहे. आजवर ३० राफेल विमाने भारतीय वायूदलाच्या ताफ्यात दाखल झाली आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तीन राफेल विमाने दाखल होणार असून एप्रिल महिन्यात उर्वरीत तीन विमाने दाखल होणार आहे. शेवटची तीन राफेल विमाने ही आणखी अत्याधुनिक असतील. हवाई दलाच्या मागणीनुसार दाखल होणाऱ्या शेवटच्या तीन राफेलमध्ये आवश्यक बदल केले जात आहेत.

२०१० नंतर विविध चाचण्या घेतल्यावर विविध लढाऊ विमानांमधून राफेल विमानांची निवड करण्यात आली आणि २०१६ मध्ये राफेल करारावर शिक्कामोर्तब करण्यात आले. प्रत्यक्षात जुलै २०२० पहिले राफेल भारतीय वायूदलात दाखल झाले. हे राफेल जरी अत्याधुनिक असले तरी बदलत्या काळानुसार, परिस्थितीनुसार, तंत्रज्ञानानुसार काही बदल करावे लागतात. आता गेली दोन वर्ष भारतीय वायूदल राफेलचा पुरेपुर वापर करत असून यामध्ये काही बदल सुचवले आहेत जे शेवटच्या तीन राफेलमध्ये केले जातील. तशी तरतूद करार करतांना करण्यात आली आहे.

हवेतून हवेत अधिक अंतरावर मारा करणारे क्षेपणास्त्र सामावून घेण्याची सोय, फ्रिक्वेन्सी जॅम करणारे रडार, अत्याधुनिक संपर्क यंत्रणा, जमिनीवरील रडारची सूचना देणारे रिसिव्हर, जमिनीवरील हालचालीची वेगाने नोंद करणारे संवेदक, विमानाच्या दिशेने येणाऱ्या क्षेपणास्त्राची जलद नोंद करणारी यंत्रणा असे काही बदल हे भारतीय वायूदलाने सुचवले आहेत. हे बदल शेवटच्या तीन राफेल लढाऊ विमानात केले जातील. जेव्हा टप्प्याटप्प्याने उर्वरीत राफेलचे नुतनीकरण करण्यात येईल तेव्हा हे आवश्यक बदल इतर ३३ राफेलमध्ये केले जातील.
दरम्यान भारताच्या राफेलशी स्पर्धा करण्यासाठी पाकिस्तान चीनकडून जे-टेन सी ही लढाऊ विमाने खरेदी करत आहे. २०२३ च्या मध्यापर्यंत चीनचे तंत्रज्ञान असलेली २५ लढाऊ विमाने पाकिस्तान वायुदलाच्या ताफ्यात दाखल होतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -