राजापूर : साखरीनाटे येथील मत्स्यव्यवसाय खात्याच्या परवाना कार्यालयासमोर गेला आठवडाभर निर्धाराने साखळी उपोषण सुरू ठेवलेल्या पर्ससीनधारक मच्छीमारांनी सोमवारी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच तहसीलदारांची भेट घेत प्रजासत्ताक दिनी राजापूर शहरात उपोषण छेडण्याचा इशारा दिला.
शासनाच्या पर्ससीन मच्छीमारीबाबत नव्या कायद्यातील जाचकतेविरोधात गेले आठ दिवस साखळी उपोषण छेडणारे साखरीनाटे भागातील पर्ससीन मच्छीमार बांधव आता आक्रमक झाले आहेत. हा जाचक कायदा रद्द करावा आणि आमच्या मागण्यांबाबत विचार करावा अशी मागणी करत यावर योग्य निर्णय न झाल्यास प्रजासत्ताक दिनी २६ रोजी राजापूर तहसीलदार कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण छेडण्याचा इशारा दिला आहे.
पर्ससीनधारक व त्यावर अवलंबून असणारे खलाशी, व्यापारी कायद्यातील नव्या जाचक अटींमुळे आपल्या रोजीरोटीला मुकले असून उपासमारी व बेकारी निर्माण झाली आहे. मात्र आठ दिवस झाले तरी शासन व प्रशासनाकडून याबाबात कोणतीच दखल घेण्यात आलेली नाही वा कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे या मच्छीमार बांधवांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सध्या समुद्रात परप्रांतीय फास्टर नौकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे आधीच बेजार झालेला येथील मच्छीमार चिंतातूर झाला आहे. येथील मच्छीमार लोकांनी परप्रांतीय फास्टर नौकांच्या अतिक्रमणाबाबत मत्सव्यवसाय खात्याला कळविले असतानाही त्याकडे ते दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
याबाबत योग्य पध्दतीने निर्णय झाला नाही तर आम्ही २६ जानेवारीला तहसीलदार राजापूर यांच्या कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार असल्याचा इशारा मच्छीमार बांधवांनी दिला आहे.
याप्रसंगी मच्छीमार सिकंदर हातवडकर, शाहदत हाबीब, आदील म्हसकर, सलाउद्दीन हातवडकर, इम्तीयाज भाटकर, नियाज म्हसकर, हातिफ हातवडकर, नुईद काझी आदींसह मच्छीमार बांधव उपस्थित होते.