मुंबई : कोरियाच्या १८ व्या ‘चिऑन्गजू जिकजी’ आंतरराष्ट्रीय कॅलिग्राफी बिनाले स्पर्धेमध्ये भारतीय सुलेखन कलेचा गौरव करण्यात आला. ‘कोरियन आर्ट म्युझिअम’ या कलादालनात २३ डिसेंबर २०२१ ते २८ डिसेंबर २०२१ या दरम्यान आयोजित केलेल्या १८व्या ‘चिऑन्गजू जिकजी’ जागतिक अक्षर सुलेखन स्पर्धेमध्ये भारतातील ४० सुलेखनकारांनी मिळून विविध भाषेतील ७१ कलाकृती पाठविल्या होत्या. यापैकी सुलेखनकार अच्युत पालव, नारायण भट्टाथिरी यांच्याबरोबरच अक्षया ठोंबरे, रूपाली ठोंबरे आणि शुभांगी गाडे या भारतीय कलाकारांच्या कलाकृतींना पारितोषिके मिळालेली आहेत.
या स्पर्धेसाठी शांती, ऐक्य, प्रेम अशा विविध विषयांवर चित्रे मागविली होती. विशेष म्हणजे कोरियाची पारंपरिक पद्धत जपण्यासाठी सहभागी कलाकारांसाठी कोरियन पेपर खास पाठविण्यात आला होता. त्यामुळे भारतीय कॅलिग्राफरना काम करण्यासाठी उत्साह आला.
‘चिऑन्गजू जिकजी’ जागतिक अक्षर सुलेखन स्पर्धा फक्त जिकजी आणि हंन्गूल या शहरांचा जगाला परिचय करून देण्यासाठी नसून सुलेखन या त्यांच्या केंद्रीय प्रदेशातील एकमात्र सांस्कृतिक वारसा असलेल्या कलेला नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आहे. यात अनेक देशांतील सुलेखनकारांनी आपापल्या लिपीत कलाकृती सादर केल्या.