Monday, July 15, 2024
Homeताज्या घडामोडीनवी मुंबई मनपाने विभागांतील सरसकट बदल्या केल्याने कामांवर परिणाम

नवी मुंबई मनपाने विभागांतील सरसकट बदल्या केल्याने कामांवर परिणाम

नागरिकांमधून व्यक्त होतोय संताप

दीपक देशमुख 

 नवी मुंबई : नवी मुंबई महानगर पालिका प्रशासनाने महिन्याभरापूर्वी काही विभागांतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या. परंतु बदल्या करताना त्या सरसकट केल्या. त्यामुळे त्यांच्या जागेवर आलेल्या व नव्याने रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना त्या विभागांतील कामाचा गंध नसल्याने नागरी कामे करताना अडचणींमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे आता त्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. तसेच कामानिमित्त कार्यालयात गेलेल्या नागरिकांची गोची होत असल्याने ते संताप व्यक्त करत आहेत. त्यासाठी बदल्यांचे सत्र राबविताना टप्प्या – टप्प्याने बदल्या कराव्यात अशी मागणी होत आहे.

डिसेंबर २०२१ महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात स्थानिक स्वराज्य कर,मालमत्ता कर,लेखा परीक्षण, विभाग कार्यालय,उद्यान,सचिव व प्रशासन विभागातील एकूण पावणे दोनशे आधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या प्रशासन विभागाने आयुक्त अभिजित बांगर यांच्या आदेशाने केल्या होत्या. बदल्यांमध्ये प्रशासकीय अधिकारी,अधीक्षक,वरिष्ठ लेखनिक,लेखनिक,नोटीस बाजावणीस व ८९ करार पद्धतीवरील लिपिक यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. परंतु इतर विभागांच्या तुलनेत मालमत्ता कर व स्थानिक स्वराज्य संस्था विभागांतील बहुतांशी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या सरसकट बदल्या प्रशासनाने केल्याने नव्याने रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना कामकाजाची माहिती नसल्यामुळे ते त्रस्त झाले असल्याचे दिसत आहे.

नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाचा सर्वात मोठा आर्थिक प्राप्तीचा मार्ग म्हणजे मालमत्ता कर विभाग. या ठिकाणून आजतागायत कोट्यावधी रुपयांची प्राप्ती झाली आहे. तर यावर्षीचा सहाशे कोटींचे उद्दिष्ट आहे. इतका महत्वाचा हा विभाग असताना ह्या विभागातील मागील पाच वर्षे कार्यरत असलेल्या आधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या बदल्या करताना त्या टप्प्याटप्प्याने करणे अपेक्षित होते.परंतु तसे न करता सरसकट बदल्या केल्या. त्यामुळे कामकाजात अडचणी निर्माण होऊन महसुलावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

कोपरखैरणे येथील विभाग कार्यालयाच्या इमारतीमध्ये असलेल्या स्थानिक स्वराज्य कर विभागात देखील यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. जरी केंद्र शासनाने जीएसटी कर लागू केल्या नंतर स्थानिक स्वराज्य कर हा विभाग २०१९ मध्ये रद्द करण्यात आला.परंतु या विभागाकडून आजही शेकडो व्यावसायिकांकडून बाकी असलेला कररुपी महसूल वसूल करण्याची धडपड चालू आहे.पण एका कर्मचाऱ्याला लाच घेताना पकडल्या नंतर प्रशासनाने झाडाझडती घेउन बत्तीसच्या बत्तीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यामुळे येथे नव्याने नियुक्ती केलेल्या आधिकारी व कर्मचाऱ्यांना स्थानिक स्वराज्य कर विभागाची इंत्यभूत माहिती नसल्याने त्यांचीही गोची होत आहे.यावर सर्वोत्तम मार्ग म्हणजे काही कालावधी उलटल्यावर बदल्या करणे सोयीस्कर असल्याचे प्रशासन सूत्रांनी सांगितले.

टप्प्याटप्प्याने बदल्या करा-सुधीर पाटील,उपजिल्हाध्यक्ष,युवक काँग्रेस,नवी मुंबई.

शासन निर्णयानुसार बदल्या करणे गरजेचे आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या विभागाचा अनुभव येतो.हे चांगले आहे.परंतु मालमत्ता कर किंवा स्थानिक स्वराज्य कर विभागातील सरसकट बदल्या केल्याने नागरिकांना तर त्रास होतोच आहे.पण नव्याने रुजू झालेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना देखील होत आहे.म्हणून टप्प्याटप्प्याने बदल्या करणे काळाची गरज आहे.

सारासार विचार करूनच बदल्या करा -दादासाहेब चाबुकस्वार,उपायुक्त, प्रशासन, पालिका.

बदल्या करताना सारासार विचार करूनच बदल्या केल्या जातात. ज्या बदल्या केल्या आहेत. त्यातील ज्या विभागात रुजू झालेले अधिकारी व कर्मचारी आहेत.त्यांना त्या त्या विभागाचा बऱ्या पैकी अनुभव आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -