Monday, October 20, 2025
Happy Diwali

पालिकेत होणार आयुर्वेदिक, होमियोपथी डॉक्टरांची भरती

पालिकेत होणार आयुर्वेदिक, होमियोपथी डॉक्टरांची भरती

पालघर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने डॉक्टर भरतीस सुरवात केली आहे. पालिकेने बंद केलेले कोरोना उपचार केंद्र पुन्हा एकदा सुरू केल्यामुळे डॉक्टरांची गरज लागणार असून त्यासाठी ३० डॉक्टरांची ठेका पद्धतीवर नियुक्ती करण्यात येणार आहे. यामध्ये १५ आयुर्वेदिक व १५ होमियोपथी डॉक्टरांचा समावेश आहे.

राज्यात तिसऱ्या लाटेला आता सुरुवात झाली असून या लाटेचा प्रादुर्भाव कधीपर्यंत राहील हे सांगता येत नाही, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी सांगितले. वसई-विरार महानगरपालिका हद्दीत कोरोना रुग्णवाढही नोंदवली गेली होती. मागील पाच दिवसांत चार हजाराच्या आसपास रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पालिकेने तात्पुरती बंद केलेली कोरोना उपचार केंद्रे पुन्हा सुरू केली आहेत. यामध्ये बोळींज आणि नालासोपारा तसेच वरुण इंडस्ट्री येथील उपचार केंद्राचा समावेश आहे. तसेच पालिका आता म्हाडाची इमारत ताब्यात घेऊन उपचार केंद्र सुरू करणार आहे.

या सर्व केंद्रांवर उपचारासाठी पालिकेच्या डॉक्टरांचा ताफाही कमी पडत असल्याने पालिकेने अतिरीक्त डॉक्टर भरती करण्यास सुरवात केली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान ठेका पद्धतीवर पूर्वी नेमण्यात आलेल्या डॉक्टरांपैकी ३० डॉक्टरांना पुन्हा नियुक्ती देण्यात येणार आहे. या डॉक्टरांना तीन महिन्यांच्या कालावधीसाठी ठेका पद्धतीवर घेण्यात येणार असून त्यासाठी पालिकेने नियुक्ती प्रक्रिया सुरु केली आहे.

Comments
Add Comment