Thursday, November 7, 2024
Homeमहत्वाची बातमीधन्य त्या जिजाऊ..

धन्य त्या जिजाऊ..

पूर्णिमा शिंदे

जिजा माऊली गे तुला वंदना ही, तुझ्या प्रेरणेने दिशामुक्त दाही.’ थोर राजमाता महत्त्वाकांक्षी, आदर्श संस्कारांची जननी, छत्रपतींच्या पहिल्या गुरू. संकटकाळी त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहणारी, दूरवरची संधी टिपणारी दूरदर्शी माता. हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकारताना ज्ञान, माहिती, कौशल्य, रणनीती, रयत सैनिक, लष्कर, लढाया या साऱ्या घटनांची नोंद पाहता आदर्श मातेने क्षणाक्षणाला छत्रपती शिवरायांना घडविले. सर्वांगीण विकासातूनच स्वराज्याचे मंगलतोरण बांधले. परकियांचे डाव उधळून लावून गनिमी काव्याने प्रसंगी शक्तियुक्तीने सारे डावपेच आणि वार झेलले. मराठा धर्म वाढविला. मंदिराचे कळस आणि दारीची तुळस कधीच उद्ध्वस्त होऊ दिली नाही.

स्वराज्य हे सुराज्य व्हावे. दीनदुबळ्यांचा, शेतकऱ्यांचा, स्त्रियांचा आदर यासाठीही विशेष कार्य केले. अद्वितीय, अलौकिक जाणता राजा शिवछत्रपती, भूपती, दलपती, हिंदवी स्वराज्य प्रतिपालक, क्षत्रियधर्म रक्षक, निश्चयाचा महामेरू बहुतजनांसी आधारू असे शिवराय मनामनांत-घराघरांत महाराष्ट्राचे आराध्यदैवत ठरले ते धन्य त्या जिजाऊंमुळेच. छत्रपतींनी मासाहेबांच्या शिकवणीप्रमाणे आयुष्यभर कार्य केले. त्यांच्या पाठबळावर, आशीर्वादाने स्वराज्यासाठी जोखीम आणि धाडस पत्करले. स्वराज्यनिर्मितीच्या कार्याला ईश्वरी अधिष्ठानसुद्धा आहे. म्हणूनच किल्ल्यावर शंभूमहादेवाचे मंदिर ही नित्य सैनिकांना आपण घेतलेल्या स्वराज्यशपथेची स्मरण देत, दिशादर्शन करतील. ही राजमातांनी दिलेली शिकवण होती.

दुसरी महत्त्वाची आठवण, ‘मोरपिसांची’. ध्येयप्राप्तीच्या दिशेने जाण्यासाठी ते मोरपीस सर्वोच्च मानबिंदू मानीत. राजेंनी विचारल्यावर आऊसाहेब म्हणतात, “राजे मोरपीस हे यशोदा मैयाने लाडक्या श्रीकृष्णास सदैव मुकुटात धारण करण्यास लावले. याचे कारण मोरपीस हे राजेपणाचे लक्षण आहे. मोर हा पक्ष्यांचा राजा तसे तुम्ही रयतेचे राजे आहात! मोर सापांना खातो तुम्हीसुद्धा रयतेच्या अन्यायाला कारणीभूत दुष्टांना सापांना संपवावे!” तसेच मोरपीस एक अजून गोष्ट शिकवते. सर्वांना एकत्र करून काला करणे. ऐक्यभावना आपली जबाबदारी सांभाळून, प्रत्येकाने स्वतःचे आत्मपरीक्षण करून, बालगोपाळांनी जातीभेदाला मूठमाती द्यावी. विश्वबंधुत्वाची, ऐक्याची प्रेरणा यातून मासाहेबांनी छत्रपतींना दिली. आपल्या मुलास शून्यातून छत्रपती केलं. राज्यभिषेक केला तेव्हा त्या मुकुटातही राजमाता जिजाऊंनी स्वतःच्या हातांनी मोरपीस लावले.

ध्येयनिश्चिती ते ध्येयप्राप्तीपर्यंत राजमाता जगल्या. इ.स. १६४५ ते १६७४ असा २९ वर्षांचा सातत्यपूर्ण हिंदवी स्वराज्य उभारणीत मासाहेबांचे योगदान महत्त्वाचे होते. राज्यनिर्मिती करताना यश-अपयश, सुखदुःख यात सदैव छत्रपतींच्या पाठीशी राजमाता उभ्या राहिल्या. आपले ध्येय पूर्ण केलं आणि मग बारा दिवसांनी १७ जून १६७४ पाचाड येथे पावन देह ठेवला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -