
पेणमधील जनतेला सुनील तटकरे यांचा मागील पंधरा वर्षांचा इतिहास माहिती आहे. पेण अर्बन बँक बुडविण्याला कारणीभूत कोण आहे? ऐपत नसणाऱ्यांना कोटीकोटी रुपयांची कर्जे देण्याच्या चिठ्ठ्या कोण देत होता? हे पेणमधील जनतेला माहिती असल्याने दोन्ही लोकसभा निवडणुकीत पेण शहरातील जनतेने तटकरेंना नाकारले आहे. याची त्यांना पुरती कल्पना असल्याचे आमदार रवींद्र पाटील यांनी सांगितले.
रायगडातील सत्तेच्या चाव्या या मागील अनेक वर्षांपासून तटकरे कुटुंबाच्या ताब्यात आहेत, ही रायगडची शोकांतिका असल्याची टीका करताना घरात पाच आमदार स्वतः खासदार झाले असले तरी त्यांची सत्तेची भूक भागत नाही. जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार असताना पालकमंत्रीपद हे एक आमदार असलेल्या राष्ट्रवादीकडे आहे हे रायगडातील जनतेचे दुर्भाग्य आहे. भ्रष्टाचाराच्या पैशातून सत्ता व सत्तेतून भ्रष्टाचार हीच तटकरेंची नीतिमत्ता असल्याची टीका देखील भाजप आमदार रवींद्र पाटील यांनी यावेळी केली.
वाशी खारेपाट पाणीपुरवठा योजनेसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३८ कोटी रुपये निधी उपलब्ध करुन दिला. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘हर घर जल’ या केंद्र सरकारच्या योजने अंतर्गत अतिरिक्त २७ कोटी रुपयांचा निधी या योजनेसाठी उपलब्ध झाला आहे. त्यामध्ये तटकरेंचे योगदान काय? असा प्रश्न करतानाच सुनील तटकरेंनी ‘फोकांड्या’ मारणे बंद करण्याचा सल्ला यावेळी दिला. जलसंपदा मंत्री असताना भ्रष्टाचार कोणी केला? हे रायगड मधील जनतेला माहिती आहे. या भ्रष्टाचारामुळे ‘बाळगंगा’ धरण प्रकल्प अद्याप रखडलेला असल्याचे त्यांनी सांगितले.