कल्याण : ऑक्टोबर पासून कल्याण डोंबिवली परिसरातील ४४२ अनधिकृत नळ कनेक्शन खंडीत करण्याची धडक कारवाई केडीएमसीने केली असून अनधिकृत इमारतींना पाणीपुरवठा देऊ नये असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात एकूण ४१५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा दररोज केला जातो. यापैकी ३६० द.ल.लि पाणीपुरवठा, महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेतून आणि ५५ द.ल.लि पाणीपुरवठा एमआयडीसी कडून केला जातो. एवढ्या प्रमाणात पाणीपुरवठा होत असूनही काही भागात पाण्याची टंचाई जाणवत असल्याचे दिसून येते. यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी महापालिका परिसरातील अनधिकृत चाळी आणि अनधिकृत इमारतीतील नळ कनेक्शन्स शोधून खंडित करण्याचे निर्देश पाणी पुरवठा विभागास दिले आहेत.
त्या अनुषंगाने ऑक्टोबर २१ ते आज पर्यंत कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा किरण वाघमारे यांच्या पथकाने डोंबिवली परिसरातील ३६३ अनधिकृत इमारती व अनधिकृत चाळींमधील नळ कनेक्शन शोधून त्याच प्रमाणे कल्याणचे कार्यकारी पाणी पुरवठा अभियंता प्रमोद मोरे यांच्या पथकाने कल्याण परिसरातील ७९ अनधिकृत इमारती व अनधिकृत चाळींमधील नळ कनेक्शन शोधून ते खंडित केले आहेत.
यापुढे ही कारवाई अधिक कठोर स्वरूपात करण्यात येणार असून कोणत्याही परिस्थितीमध्ये अनधिकृत इमारतींना पाणीपुरवठा देऊ नये असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.