Wednesday, April 30, 2025

महामुंबईमहत्वाची बातमी

पेअँड पार्किंग कंत्राट कामात १०० कोटींचा घोटाळा

पेअँड पार्किंग कंत्राट कामात १०० कोटींचा घोटाळा

मुंबई :  मुंबई महापालिकेच्या पे अँड पार्किंग कंत्राट कामात १०० कोटी रुपयांचा घोटाळा होत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे. रवी राजा यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे पालिकेच्या आनलाईन सभेत आरोप केला.

मुंबईत अंदाजे २५० पे अँड पार्किंग सेंट्रल एजन्सीकडे आहेत. वॉर्डनिहाय ५०० पे अँड पार्किंग आहेत. या सर्व पे अँड पार्किंगच्या कंत्राट कामातून पालिकेला दरवर्षी किमान १०० कोटींचे उत्पन्न अपेक्षित आहे. मात्र असे असताना त्यावर संबंधित कंत्राटदार व पालिका अधिकारीच बसले आहेत. त्यामुळे पालिकेला कोट्यवधी रुपयांचा आर्थिक फटका बसत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

मुंबईतील किंवा शहरी भागातील पे अँड पार्किंगची कंत्राटकामे एकाच कंत्राटदाराकडे मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे अनेक वर्षांपासून त्यांची मक्तेदारी व मनमानी सुरू असते. मात्र त्यांची मक्तेदारी मोडण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांच्या मागणीवरून महिला बचतगटांना काही ठिकाणी पे अँड पार्किंगची कामे देण्यात आली होती. मात्र तेथेही पालिका अधिकारी यांच्याशी संगनमत करून तेथील कंत्राट कामे स्वत:च्या ताब्यात घेतली आहेत. असे असताना पालिका प्रशासन त्या बाबत काहीच कारवाई करत नाही, असा आरोप रवी राजा यांनी केला. यावेळी प्रशासनाने पालिका पे अँड पार्किंग प्रकरणी माहिती घेऊन अहवाल सादर करावा असे आदेश महापौर किशोरी पेडणेकर यांनी देत रवी राजा यांचा हरकतीचा मुद्दा राखून ठेवला.

Comments
Add Comment