नवी दिल्ली : भारतात गेल्या आठवड्याभरात कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत होती. तसेच काल दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट १३ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. मात्र आज त्यामध्ये घट दिसून आली आहे. गेल्या २४ तासात देशात १ लाख ६८ हजार ६३ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले. तर ६९ हजार ९५९ जण कोरोनामुक्त झाले. दिवसभरात २७७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
कोरोनाचा नवा व्हेरिअंट ओमायक्रॉनमुळे चिंता व्यक्त केली जात असताना त्याच्याही नव्या रुग्णसंख्येचा वेग सध्या मंदावला आहे. गेल्या दोन दिवसात ५०० च्या आसपास ओमायक्रॉनचे रुग्ण दिवसभरात सापडत आहेत. काल ४ हजार रुग्णांचा टप्पा पार केल्यानंतर आज एकूण ओमायक्रॉन बाधितांची संख्या ४ हजार ४६१ इतकी झाली आहे. सध्या देशात सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या ८ लाख २१ हजार ४४६ इतकी आहे. तर पॉझिटिव्हीटी रेट १०.६४ टक्के इतका आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढत असताना केंद्र सरकारने राज्य सरकारांना पत्र लिहिले आहे. यात पुढच्या काळात रुग्णसंख्या किती वेगाने वाढेल याचा अंदाज नसल्याने रुग्णालयांतील सुविधा अद्ययावत ठेवाव्यात, अशी सूचना केली. दरम्यान, आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनीही राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांची व वरिष्ठ अधिकाऱ्यांची व्हर्च्युअल बैठक घेतली. राज्यांनी कोणत्या पद्धतीने ‘मायक्रो मॅनेजमेंट’१ कडे लक्ष ठेवावे याच्याही सूचना दिल्या आहेत.