- डॉ. सर्वेश सुहास सोमण, गुंतवणुकीचे साम्राज्य
शेअर बाजाराच्या पुढील वाटचालीचा अंदाज बांधत असताना एक गोष्ट गुंतवणूकदारांनी लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे शेअर बाजाराचे पी. ई. गुणोत्तर. सध्या पी. ई. गुणोत्तर खूप जास्त आहे.
शेअर बाजार हा आज टेक्निकल बाबतीत नक्कीच तेजीत आहे. मात्र फंडामेंटल बाबतीत पी. ई. गुणोत्तरासह अनेक मूलभूत गुणोत्तरे ही अत्यंत धोकादायक पातळीजवळ आलेली आहेत. त्यामुळे शेअर बाजाराचे फंडामेंटलनुसार मूल्यांकन जोपर्यंत स्वस्त होत नाही, तोपर्यंत गुंतवणूक करीत असताना योग्य नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. गुंतवणूक करीत असताना सर्वच्या सर्व गुंतवणूक एकाच शेअर्समध्ये करू नये. पैशाचे योग्य विभाजन आणि व्यवस्थापन करून त्यानुसार टप्प्याटप्प्याने शेअर खरेदी करावी. गुंतवणूक करीत असताना गुंतवणुकीचा कालावधी ठरवणे अत्यंत आवश्यक आहे. दीर्घमुदतीची गुंतवणूक ही नेहमीच फायदेशीर असते; मात्र सध्या असलेले निर्देशांकांचे असलेले पी. ई. गुणोत्तर पाहता अल्पमुदतीच्या गुंतवणुकीचाच विचार करणे योग्य ठरेल. त्याचबरोबर शेअर्स खरेदी विक्री करीत असताना स्टॉपलॉसचा वापर करणे आवश्यक आहे. सध्या मध्यम मुदतीच्या चार्टनुसार निर्देशांकाची गती तेजीची आहे. त्यामुळे टेक्निकल अॅनालिसीसनुसार तेजीत असणाऱ्या शेअर्समध्ये अल्पमुदतीचा विचार करता स्टॉपलॉसचा वापर करूनच तेजीचा व्यवहार करता येईल.
अल्पमुदतीसाठी कजारिया सिरामिक, दीप इंडस्ट्रीज, पेज इंडस्ट्रीज, टायटन यांसह अनेक शेअर्सची दिशा तेजीची आहे. मध्यम मुदतीच्या चार्टनुसार ‘इंडोरामा’ या शेअरने ६३ ही अत्यंत महत्त्वाची पातळी तोडत तेजी सांगणारी रचना तयार केलेली असून आज ६९ रुपये किमतीला असणाऱ्या या शेअरमध्ये मध्यम मुदतीत आणखी वाढ होऊ शकते. मध्यम मुदतीसाठी जोपर्यंत ‘इंडोरामा’ हा शेअर ५० रुपये किमतीच्या वर आहे, तोपर्यंत या शेअरमधील तेजी कायम राहील. अल्प तसेच मध्यम मुदतीचा विचार करता टेक्निकल बाबतीत तेजीची दिशा असणाऱ्या शेअर्समध्ये स्टॉपलॉसचा वापर करूनच गुंतवणूक करावी. शेअर बाजारात बऱ्याच वेळा गुंतवणूकदार स्टॉपलॉसचा उपयोग करताना दिसून येत नाही. परिणामी होत असलेल्या तोट्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असते. पुढील काळात स्टॉपलॉसचा वापर टाळणे, ही मोठी चूक ठरू शकते. कारण ज्यावेळी फंडामेंटल बाबतीत निर्देशांक महाग झालेले असतात, त्यावेळी निर्देशांकात होणाऱ्या घसरणीच्या तुलनेत शेअर्समध्ये होणारी घसरण ही फार मोठी असते. त्यामुळे गुंतवणूक करीत असताना स्टॉपलॉस अत्यंत आवश्यक आहे.
शेअर बाजारात नफाखोरी अर्थात प्रॉफिट बुकिंगची शक्यता लक्षात घेता ऑप्शन मार्केटमध्ये जोखीम घेण्याची क्षमता असणाऱ्या गुंतवणूकदारांनी पुढील २ आठवड्यांचा विचार करता या महिन्याच्या ‘पुट ऑप्शन’मध्ये व्यवहार केल्यास चांगला फायदा होऊ शकेल. ऑप्शन खरेदी ही नेहमीच अत्यंत जोखीमेची असते. त्यामुळे त्यामध्ये आपली जोखीम घेण्याची क्षमता लक्षात घेऊनच गुंतवणूक करावी. मध्यम मुदतीच्या चार्टनुसार या आठवड्यासाठी निर्देशांक सेन्सेक्सची ५८३०० आणि निफ्टीची १७४०० ही अत्यंत महत्त्वाची खरेदीची पातळी आहे. जोपर्यंत निर्देशांक या पातळीच्या वर आहेत तोपर्यंत निर्देशांकातील तेजी कायम राहील.
सध्या कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे, त्यामुळे पुढील काळात पुन्हा एकदा लॉकडाऊन झाल्यास त्याचा परिणाम शेअर बाजारावर देखील होऊ शकतो, त्यामुळे बाहेरील घडणाऱ्या या गोष्टींचा विचार करता सावधानतापूर्वक स्टॉपलॉसचा योग्य वापर करूनच गुंतवणूक करणे अपेक्षित आहे.
कमोडीटी मार्केटमध्ये टेक्निकल अॅनालिसिसनुसार अल्पमुदतीसाठी सोने या मौल्यवान धातूची दिशा रेंज बाऊंड असून सोने ४८५०० ते ४६५०० या पातळीत अडकलेले आहे. सध्या ओमायक्रॉन आणि कोरोनाच्या वाढीच्या स्थितीमुळे आगामी काळात पुन्हा एकदा सर्वात सुरक्षित समजली जाणारी गुंतवणूक अर्थात सोने यामध्ये पुन्हा पैसा येऊ शकतो. त्यामुळे पुढील काळात सोन्यामध्ये मोठी वाढ होऊ शकते, मात्र त्यासाठी रेंज बाऊंड स्थितीतून सोन्याने बाहेर पडून तेजीची रचना करणे आवश्यक आहे. अल्पमुदतीचा विचार करता जर सोन्याने पुढील काळात ४८२०० ही पातळी तोडली, तर सोन्यात अल्पमुदतीत चांगली वाढ होईल.
चांदीच्या बाबतीत बोलायचे झाल्यास चांदी अल्पमुदतीसाठी चांदीची दिशा हे देखील अजूनही मंदीची आहे. जोपर्यंत चांदी ६२५०० या पातळीच्या खाली आहे तोपर्यंत चांदीमधील मंदी कायम राहील. चांदीची ६०००० ही महत्त्वाची खरेदीची पातळी असून पुढील आठवड्यात ही पातळी बंदभाव तत्त्वावर तुटली, तर चांदीत आणखी १५०० ते २००० रुपयांची घसरण होऊ शकते. त्यामुळे सध्या सोने आणि चांदी खरेदीसाठी योग्य वेळेची वाट पाहणे हेच योग्य ठरेल.
(लेखकाची तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाइकांची लेखात सुचवित असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणतीही गुंतवणूक नाही किंवा सुचविलेल्या कंपन्यांशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून कंपनीकडून कोणतेही मानधन किंवा भेटवस्तू घेतलेली नाही.)