मुंबई : गाणी ऐकण्यासाठी दिलेला मोबाइल परत मागितल्याच्या रागातून मित्राचीच हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपाडा येथे ही घटना घडली असून वॉर्ड बॉय असणाऱ्या सन्मान सावंत याची हत्या करण्यात आली. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सन्मान सुधीर सावंत असे मृत व्यक्तीचे नाव असून या प्रकरणी नागपाडा पोलिसांनी दिलीपकुमार हरिकिशन राम (वय २४) याला अटक केली आहे. आरोपी दिलीपकुमार आणि मृत सन्मान हे दोघंही एकमेकांचे मित्र असून एकाच परिसरात राहण्यास आहेत.
दोघंही एकत्र फिरत असताना आरोपींचा गाणे ऐकण्यासाठी घेतलेला मोबाइल परत दिला नाही. याचा राग अनावर झाल्याने दोघांमध्ये गुडलक इंजनिअरिंग वर्क्स स्कूलच्या समोर भांडण झाले. त्यावेळी आरोपी दिलीपकुमारने सन्मानला जोरदार धक्का दिला. त्यावेळी सन्मान हा तोल जाऊन रस्त्यावरील गाड्यांमध्ये जाऊन पडला. त्यावेळी त्याच्या डोक्याला मार लागला. हे पाहून आरोपी़ने पळ काढला. गंभीर जखमी झालेल्या मित्राचा मृत्यू झाला. या प्रकरणी नागपाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला नागपाडा पोलिसांनी अटक केली आहे.