मुंबई : उत्तर भारतात सध्या थंडीची तीव्र लाट आली आहे. अनेक ठिकाणी हिमवृष्टी होत आहे. याचा एकंदरीत परिणाम म्हणून मुंबईसह राज्यातील हवामानात झपाट्याने बदल होत आहे. मागील चोवीस तासांत मुंबईसह राज्यात अचानक थंडीचा कडाका वाढला आहे. राज्यात सर्वत्र किमान तापमानात घसरण झाली आहे. मुंबईत मागील चोवीस तासांत तब्बल ५ अंश सेल्सिअस तापमानाची घसरण झाली आहे. कमाल तापमान देखील घटले आहे. त्यामुळे मुंबईकर गुलाबी थंडीचा आनंद लुटत असून रात्री रस्त्यावर शेकोट्या पेटवणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे.
स्कायमेट या हवामान संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील सांताक्रुझ परिसरात १३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. हे तापमान यंदाच्या हंगामातील सर्वात कमी तापमान आहे. विशेष म्हणजे गेल्या २४ तासात मुंबईत किमान तापमानाचा पारा ५ अंश सेल्सिअसने घसरला आहे. तसेच कमाल तापमानात देखील घसरण झाली असून पारा २६.७ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. येत्या तीन चार दिवसांत मुंबईतील हवामान जैसे थे राहणार असून थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतात थंडीची लाट सुरू आहे. अनेक ठिकाणी बर्फवृष्टी होत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. उत्तर पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव निर्माण झाला असून हे वारे वायव्य आणि मध्य भारतात वाहत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढताना दिसत आहे, अशी माहिती स्कायमेट या हवामान संस्थेचे शास्त्रज्ञ महेश पालवत यांनी ट्विटमधून दिली आहे.
पुढील किमान आठवडाभर मुंबईसह राज्यात हीच स्थिती कायम राहणार आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.