Tuesday, September 16, 2025

मॅकविलाच्या गिर्यारोहकांनी वानरलिंगी सुळका केला सर

मॅकविलाच्या गिर्यारोहकांनी वानरलिंगी सुळका केला सर

सुधागड-पाली(प्रतिनिधी) : सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांना सुधागड तालुक्यातील ‘मॅकविला द जंगल यार्ड’मधील साहसी प्रस्तरारोहकांनी अनोखी गिर्यारोहण मानवंदना दिली आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील वानरलिंगी हा ४०० फूट उंच सुळका नुकताच सर करण्यात आला. यावेळी सुळक्याच्या टोकावर पोहोचून सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून गिर्यारोहण मानवंदना देण्यात आली. तसेच भारताचा झेंडाही फडकवण्यात आला.

या मोहिमेत सुधागड तालुक्यातील प्रस्तरारोहक व ‘मॅकविला द जंगल यार्ड’चे संस्थापक मॅकमोहन हुले आणि त्यांचे सहकारी प्रणय पाटील, अभिजीत राजगुरू व विकी घोडके हे सहभागी होते. हे गिर्यारोहक प्रथम आपल्या ७०-८० लिटर बॅकपॅक सह मोटार सायकलवरून जुन्नरला पोहोचले. नंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी ११च्या सुमारास ते सुळक्याजवळ पोहोचले. दुपारी एक वाजता वानरलिंगी सुळक्यासाठी प्रस्तारोहण चालू केले. मॅकमोहन यांनी प्रथम प्रस्तरारोहणाला सुरुवात केली. त्यांना सुरक्षा दोर प्रणय पाटील यांनी दिला. अनेक मोहिमांचा अनुभव असलेल्या या गिर्यारोहकांनी सुरक्षिततेचे भान ठेवून चार तासांत हा सुळका सर केला व तेथे सिंधुताईंना अनोखी श्रद्धांजली व गिर्यारोहण मानवंदना दिली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा