Sunday, May 4, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

राज्यात कायदा - सुव्यवस्थेचे धिंडवडे

राज्यात कायदा - सुव्यवस्थेचे धिंडवडे

नाशिक  :‘लोकांना पोलिसांचा आधार मिळत नसून गुंडांचा धाक वाटत आहे. त्यामुळे गुन्हे रोखण्याबाबत नागरिकही बघ्याची भूमिका घेत आहेत. राज्यात कायदा व सुव्यवस्था यांचे धिडवडे निघाले आहेत. गायब होणाऱ्या महिलांचे नेमके काय होते? याचे उत्तर सरकार व पोलिसांनी द्यावे. सरकार निष्क्रिय असल्याने राज्यातील महिला अत्याचाराचे जीवन जगत आहेत,’असा घणाघात भाजपच्या महाराष्ट्र उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सोमवारी केला. आपल्या दौऱ्यावेळी त्यांनी त्रंबकेश्वर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी त्यांनी महामृत्युंजय जप केला.वसंतस्मृती या भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर भाजप शहर अध्यक्ष गिरीश पालवे, प्रदेश पॅनलिस्ट लक्ष्मण सावजी, पवन भगूरकर, सुनील बच्छाव आदी मान्यवर उपस्थित होते.

10 यावेळी चित्रा वाघ म्हणाल्या की, ‘राज्यात अपहरणाच्या घटना या मोठ्या प्रमाणात घडत आहेत. ही चिंतेची बाब असून राज्यात पोलीस आयुक्त ते मुख्यमंत्री हे सगळेच गायब होत आहेत.राज्यात कायद्याचा धाक राहिलेला नसून कायद्याची अंमलबाजवणी करणारे कमजोर झाले असल्याची टीकाही त्यांनी केली. नाशिकमध्ये गेल्या काही महिन्यात महिलांवरील अत्याचारात सातत्याने वाढ होत असल्याची टीका करताना वाघ यांनी राज्य सरकारच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सरकार अस्तित्वात आहे की नाही, याबाबतच आता सशंकता वाटत असल्याची टीका यावेळी वाघ यांनी केली. सरकारमध्ये इच्छाशक्तीचा अभाव असून विकृतांमध्ये आपले कोणीही वाकडे करू शकत नाही हा भाव निर्माण झाला असल्याचे त्या म्हणल्या.

त्रंबकेश्वर येथील खरशेत येथील वनवासी महिलांना पाण्यासाठी होत असलेल्या अडचणींची माहिती त्यांनी घेतली. तसेच, तेथे साकव बांधण्यात आल्यामुळे तेथील तात्पुरती गरज आदित्य ठाकरे यांनी भागवली असली तरी, तेथे वरील बाजूस एक सक्षम पूल बांधला जावा अशी मागणी यावेळी वाघ यांनी केली. त्रंबकेश्वर व आसपासच्या भागातील प्रश्न हे महत्वाचे असून रस्ते, अंगणवाडी इमरात बांधकाम नसणे, आरोग्य सुविधेची असणारी वानवा, शवविच्छेदनासाठी नसणारी सुविधा, तेथे ५० टक्के लोकांना खावटी अनुदान देण्यात आलेले नसल्याचे यावेळी वाघ यांनी सांगितले. याचे उत्तर सरकारने द्यावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. राज्यातील वनवासी बहुल जिल्ह्यात व क्षेत्रात वनवासींची परवड होत असल्याची टीका यावेळी त्यांनी केली. अशा प्रकारचा भोंगळ कारभार महाविकास आघाडी सरकारमध्ये सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment