मदुराई (तामिळनाडू) : दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांच्या मनामध्ये पुन्हा भीती आणि दहशत निर्माण झाली आहे. तामिळनाडूमध्ये कोरोनाच्या भीतीने एकाच कुटुंबातील चार सदस्यांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये २३ वर्षीय महिलेचा तिच्या ३ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. तर दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तामिळनाडूतील कलमेडूजवळील एमजीआर कॉलनीत ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, २३ वर्षीय ज्योतिका आपल्या ३ वर्षींय रितीश या चिमुकल्यासह तिच्या पतीपासून वेगळी, आई लक्ष्मी आणि भाऊ सिबराजसोबत राहत होती. ज्योतिकाचे वडील नागराज यांचे अलीकडेच डिसेंबरमध्ये निधन झाले होते. त्यामुळे कुटुंबावर आर्थिक दबाव होता. ८ जानेवारीला ज्योतिका कोरोनाबाधित असल्याचे समोर आले. ही माहिती ज्योतिकाने तिच्या आईला दिली. त्यामुळे ती घाबरली. त्यानंतर कोरोनाच्या दहशतीने कुटुंबातील सर्व सदस्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आणि विष प्राशन करत कुटुंबातील सदस्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
घटनेच्या दुसऱ्या दिवशी घरात काहीच हालचाल होत नसल्याने शेजाऱ्यांनी याबाबतची माहिती तात्काळ पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहचले मात्र, पोलीस पोहोचेपर्यंत ज्योतिका आणि तिच्या मुलाचा मृत्यू झाला. तर, इतर दोघांवर मदुराईच्या शासकीय राजाजी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.