नवी दिल्ली : देशात करोनाचा संसर्ग वाढत असताना दिल्लीतील हॉस्पिटल्समधील डॉक्टरांनाही संसर्ग होत आहे. दिल्लीत जवळपास ७०० ते ८०० डॉक्टरांना करोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. या डॉक्टरांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आता संसर्ग झालेल्या या डॉक्टरांना ७ दिवस क्वारंटाईन राहण्यास सांगण्यात आलं आहे. त्यानंतर कोणतीही चाचणी न करता त्यांना ड्युटीवर रुजू होण्याचा सल्ला दिला जात आहे.
दिल्लीतील हॉस्पिटल्सच्या डॉक्टरांमध्ये करोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. दिल्लीतील केवळ ५ मोठ्या हॉस्पिटल्समधील ८०० हून अधिक डॉक्टर कोविड पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह डॉक्टरांच्या संपर्कात आलेले डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचारीही आयसोलेशनमध्ये आहेत. मोठ्या प्रमाणात आरोग्यसेविका पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य व्यवस्थेवर वाईट परिणाम झाला आहे.