मुंबई :मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाने १० जानेवारी २०२२ रोजी १००व्या वर्षात पदार्पण केले आहे. ही फक्त वस्तुसंग्रहालयाच्या इतिहासातीलच नव्हे तर देशाच्या सांस्कृतिक चळवळीच्या दृष्टीने महत्वाची घटना आहे. या सर्व कालावधीत वस्तुसंग्रहालयाने देशाच्या सांस्कृतिक परंपरेचे जतन करण्याची जबाबदारी पार पाडण्यासंदर्भात प्रमुख भूमिका निभावली.
१० जानेवारी १९२२ रोजी या वस्तुसंग्रहालाची दारे जनतेसाठी खुली झाली. या कल्पनेची रुजवात काही उत्साही नागरिकांनी केली ज्यांना त्यावेळच्या आर्थिक आघाडीवरील मुंबईला सांस्कृतिक ठेव्याचा नजराणा देण्याची इच्छा होती.
१९०४ या वर्षी मुंबई प्रांताच्या सरकारने अशा तऱ्हेचा ठराव मंजूर केला आणि मुंबईमध्ये सार्वजनिक वस्तुसंग्रहालय उभारण्याच्या दृष्टीने चाचपणी करण्यासाठी समिती स्थापन झाली. सर फिरोजशा मेहता, सर इब्राहिम रहिमतुल्ला आणि सर विठ्ठलदास ठाकरसीया मुंबईतील मान्यवरांचा या समितीमध्ये समावेश होता.
कला आणि पुरातत्वशास्त्राचे वस्तुसंग्रहालय आणि विज्ञान तसेच निसर्गविज्ञान यांचे एकत्रित वस्तुसंग्रहालय असावे असा प्रस्ताव होता. हे वस्तुसंग्रहालय, त्याला भेट देणाऱ्यांसाठी विशेषतः मुले व युवकांना स्फूर्ती देणारे साधन ठरावे असा मानस समितीतील सदस्यांचा होता. म्हणूनच वस्तुसंग्रहालयाचे मुख्य उद्दिष्ट शैक्षणिक असावे असा उद्देश त्यांनी बाळगला.
ख्यातनाम पुरातत्वशास्त्रज्ञ हेन्री क्युझेन्स यांनी १९०९ मध्ये उत्खनन केलेल्या मिरपुर्खस या बुद्धधर्माशी संबधित स्थळावरील मौल्यवान कलावस्तू या संग्रहालयातील महत्वाच्या संग्रहाचा भाग आहेत. शेठ पुरुषोत्तमदास मावजी यांचा पुराणवस्तुंचा व चित्रांचा संग्रह विश्वस्तांनी १९१५ साली खरेदी केला, याशिवाय भारतीय पुरातत्व सर्वेक्षण संस्थेने मिळवलेल्या पुराणवस्तुंनी या संग्रहालयांच्या संग्रहाचे मोल वाढवले आहे. १९२२ हे वर्ष सर रतन टाटा याच्या मृत्यूपत्राद्वारे मिळालेल्या संग्रहाने संस्मरणीय झाले. सर रतन टाटा यांनी केलेल्या विश्वकोषांचा संग्रह त्यांच्या यॉर्क, लंडन येथील घरामध्ये होता तो त्यांच्या मृत्यूपत्रातील इच्छेनुसार संग्रहालयाला प्रदान करण्यात आला.