मुंबई : पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपवली आहे.
काय आहे प्रकरण
गेल्यावर्षी पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी परमबीर सिंह यांचे मुंबईतील पब मालक आणि अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे आरोप केले होते. या संदर्भात डांगे यांनी गृह विभागाचे अपर मुख्य सचिवांना पत्रही पाठवले होते. त्या पत्रात उपरोक्त संबंधांबाबत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यावेळी व्हॉट्सअॅप ग्रुपवर वरिष्ठांच्या विरोधात संदेश पाठवल्याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
या प्रकरणाची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून केली जात होती. मात्र वर्षभर या प्रकरणाची चौकशी सुरू असून देखील काही निकाल वा निष्पन्न न लागल्यामुळे डांगे यांनी या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी केली होती. त्यानुसार या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. जलद गतीने तपास होण्यासाठी हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.