Friday, May 9, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

कोस्टल रोडच्या पहिल्या बोगद्याचे काम पूर्ण

कोस्टल रोडच्या पहिल्या बोगद्याचे काम पूर्ण
मुंबई  :  मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोड प्रकल्पाच्या पहिल्या बोगद्याचे काम सोमवारी पूर्ण झाले असून या बोगद्याची लांबी २.०७० की. मी. आहे. तर दुसऱ्या बोगद्याचे काम एप्रिल २०२२ मध्ये सुरू करण्यात येणार आहे.

मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (कोस्टल रोड) बांधकामात, पॅकेज ४ अंतर्गत प्रियदर्शिनी पार्क ते छोटा चौपाटी दरम्यान २.०७० किलोमीटर अंतराचा बोगदा दोन्ही बाजूने बांधण्यात येत आहे. यापैकी मरिन ड्राइव्हकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी वापरात येणाऱ्या पहिल्या बोगद्याचे खणन सोमवारी पूर्ण झाले असून या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, खासदार अरविंद सावंत, पालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, प्रभाग समिती अध्यक्ष मीनल पटेल हे देखील दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. तर महापौर किशोरी पेडणेकर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे प्रत्यक्ष स्थळी म्हणजे गिरगाव चौपाटी येथे उपस्थित होते. तसेच, उपआयुक्त (विशेष अभियांत्रिकी) अजय राठोर, संचालक (भूसंपादन) अनिल वानखेडे, प्रमुख अभियंता (किनारी रस्ता) विजय निघोट यांच्यासह कंत्राटदार एल अॅण्ड टी यांच्या वतीने प्रकल्पाचे व्यवस्थापक संदीप सिंग, बोगदा बांधकाम व्यवस्थापक संतोष सिंग, सल्लागार कंपनी मेसर्स यूशीन कन्सल्टंटच्या वतीने बोगदा बांधकाम व्यवस्थापक नॅमकाक चो हेही उपस्थित होते.

दरम्यान ११ जानवेरी २०२१ रोजी पहिल्या बोगद्याच्या कामाचा शुभारंभ झाला होता आणि त्यास वर्ष होण्यास एक दिवस शिल्लक असताना म्हणजे ३६४ दिवसांमध्ये या बोगद्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. ही विक्रमी कामगिरी असून संपूर्ण प्रकल्पाचे कामही वेळेत पूर्ण होईल, असा विश्वास पालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंग चहल यांनी व्यक्त केला. कार्यक्रमावेळी अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे यांच्या हस्ते पूजन व घंटानाद करण्यात आले. त्यानंतर ‘मावळा’ या बोगदा खणन संयंत्र (टीबीएम) ने बोगद्यातून बाहेर येत ‘ब्रेक थ्रू’ पूर्ण केला.
दरम्यान कोस्टल रोड चे ५० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम २०२३ मध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा आहे तर कोस्टल रोड प्रकल्पातील पॅकेज ४ अंतर्गत मुख्यत्वे दोन्ही बाजूने वाहतुकीसाठी प्रत्येकी १ अशा एकूण २ बोगद्यांचे काम अंतर्भूत आहे. हे बोगदे प्रियदर्शिनी पार्क ते नेताजी सुभाष मार्गालगत म्हणजे मरिन ड्राईव्ह येथे असणाऱ्या 'छोटा चौपाटी'पर्यंत बांधले जात आहेत. तसेच ते 'मलबार हिल' च्या खालून जाणार आहेत. या दोन्ही बोगद्यांसाठीचे खोदकाम हे जमिनीखाली १० मीटर ते ७० मीटर एवढ्या खोलीवर करण्यात येत आहे.
Comments
Add Comment