मृणालिनी कुलकर्णी
भारतीय तत्त्वज्ञानाला ज्यांनी जगाचे दरवाजे उघडले, ज्यांनी जगाला हिंदू धर्म, हिंदू संस्कृती आणि भारतीयता यांची नव्याने ओळख करून दिली ते ‘युगपुरुष स्वामी विवेकानंद’! धर्म प्रवर्तक, तत्त्वचिंतक, विचारवंत आणि वेदांतमार्गी राष्ट्रसंत अशा अनेक विशेषणांनी ओळखले जाणारे युगपुरुष स्वामी विवेकानंदाचे नाव घेताच मन:चक्षूसमोर त्यांचे तेजपूंज, देदीप्यमान, निश्चयी, स्वाभिमानी व्यक्तिमत्त्व उभे राहते. नरेंद्रनाथ दत्ता ते युगपुरुष स्वामी विवेकानंद. १२ जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस. स्वामीजींच्या कार्याची आठवण राहावी म्हणून त्यांचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय युवा दिन/नॅशनल यूथ डे’ म्हणून साजरा केला जातो.
वडील विश्वनाथ दत्ता यांची पुरोगामी विवेकवृत्ती आणि आई भुवनेश्वरीचा धार्मिक स्वभाव यातून नरेंद्रनाथाचे व्यक्तिमत्त्व घडत असताना गुरू रामकृष्ण परमहंस यांच्याकडून दीक्षा घेतली. मानवाच्या सेवेतून देशाची सेवा केली जाऊ शकते, या विचारातून त्यांनी भारतभ्रमण केले. भारतातील दैन्य पाहून भारताच्या कल्याणासाठी, जनतेच्या उद्धारासाठी, मातृभूमीचे सेवक म्हणून झटणे, माणसातील मनुष्यत्व जागे करणे आणि वेदांत विचार जगभर पोहोचविणे हा दृढ संकल्प त्यांनी केला.
शिकागोच्या सर्वधर्म परिषदेत ‘अमेरिकेतील माझ्या बंधुभगिनींनो’ असे संबोधून सर्व मानव जातीबद्दल बंधुभाव प्रकट करून भारतीय संस्काराचा सहजसुंदर अाविष्कार दाखवून उपस्थितांची मने जिंकली. या परिषदेच्या आधी राजा अजितसिंग खेत्री यांनी १० मे १८९३ला स्वामीजींना ‘विवेकानंद’ असे नाव दिले. विष म्हणजे काय? असा प्रश्न विचारताच ते म्हणाले, ‘जीवनात कोणतीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त मिळाली की, ते विष बनते. मग ती ताकद असो, पैसा असो, गर्व असो की, भूक असो.’
स्वामी विवेकानंद अाध्यात्मिक गुरू होतेच तसे समाजसुधारकही होते. लोकांच्या बुरसटलेल्या विचारांवर मात करण्यासाठी धर्महीन बंधने तोडण्यासाठी प्रयत्नशील होते. उद्याचे जग तरुणच घडविणार आहेत म्हणून आपण तरुणांना घडविले पाहिजे. यासाठी त्यांनी युवा वर्गाला प्रेरक विचार दिले. स्वामी तरुणांसाठी प्रेरणास्थानी होते.
जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वामी विवेकानंदांचे विचार समजून घेऊ
१. स्वतःवर विश्वास ठेवा. एका मिनिटात निर्णय घेऊन मोकळे व्हाल. ज्याचा स्वतःवरच विश्वास नाही, तर तुम्ही ईश्वरावर कसा विश्वास ठेवणार? सर्व देव-देवतांपेक्षा मनुष्य श्रेष्ठ आहे. फक्त माणसातील पशू वृत्तीचा नाश व्हावा. जुना धर्म सांगतो, ज्याचा देवावर विश्वास नाही तो नास्तिक. पण माझा नवा धर्म सांगतो, ज्याचा स्वतःवर विश्वास नाही तो नास्तिक.
२. तरुणांनी फक्त आपल्या कोषात न राहता, देशहिताचे भान ठेवून, जगात स्वतंत्रपणे प्रवास करावा. जगाची विचारसंस्कृती, लोकजीवन, राहणीमान, कार्यपद्धती हे सारे जाणून घ्या कारण, आदान-प्रदान, देवाण-घेवाण हा प्रकृती निसर्गाचा भाग आहे. ग्लोबल अॅप्रोचचा विचार स्वामीजींनी त्या काळात केला होता.
३. युवकांनो! तुम्ही तुमच्या जीवनात जोखीम घ्या. जिंकलात, तर नेतृत्व कराल. जर हरलात, तर मार्गदर्शन करा.
४. जग ही विशाल व्यायाम शाळा आहे. जिथे आपण स्वतःला मजबूत बनवितो. अनुभव हेच मोठे शिक्षण आहे. दुसऱ्याकडून चांगले ते शिका. पण स्वतःच्या मार्गाने जा.
५. कोणतीही गोष्ट संपादन केल्याशिवाय स्वतःची होत नाही.
६. माणूस पैशांनी गरीब कधी नसतो. तो गरीब होतो कारण, स्वप्नातही तो महत्त्वाकांक्षा बाळगत नाही.
७. तेव्हा ‘उठा! जागे व्हा! लक्ष्य साध्य होईपर्यंत थांबू नका. धेर्यवान बना, सामर्थ्यवान बना. पण स्वतःला कमकुवत समजू नका. आपणच आपल्या नशिबाचे निर्माते आहोत. स्वामीजींना त्यांच्या वडिलांनी त्यांच्यासाठी पूर्ण उंचीचा आरसा दिला होता. आरशासमोर उभे राहताच विवेकानंदाना आपल्या अवयवांची ओळख पटली.
८ तुमच्या आयुष्यात अंधश्रद्धेने प्रवेश केला की, मेंदू काम करीत नाही.
९. याच अंधश्रद्धेतून शुभ-अशुभ हे शब्द ऐकतो. डोळा फडफडतोय, मांजर आडवं गेलं. खरेतर मांजर त्याच्या मार्गाने गेले. मांजर म्हणते का, मनुष्य आडवं गेलं? शुभ-अशुभ हे विचारांचे फळ आहे.
१०. मन स्थिर करा, तरच तुम्ही मार्ग काढू शकाल.
११. माणुसकी हा विवेकानंदांचा मुख्य धर्म होता. ती त्यांची शिकवण होती. ते म्हणतात, नेतृत्व करताना सेवक व्हा, निस्वार्थी व्हा. असीम संयम बाळगा; परंतु आज धर्माच्या वेगवेगळ्या झेंड्यांसाठी माणसा-माणसांत लढे होत आहेत म्हणून तरुणांचे मन तळ्यात-मळ्यात असते. त्यात विवेकाची गरज आहे. प्रत्येकजण कशासाठी तरी हपापलेला असतो. हे दोष जावेत यासाठी प्रयत्न करावेत.
१२. शेवटी अनासक्त व्हा अन् कार्य चालू ठेवा. स्वामीजी म्हणतात, ‘प्रकृतीच्या नियमानुसार शरीरे येतात आणि जातात. मी मेल्यावर मला स्वर्गात जायचे आहे. धर्म सांगतो म्हणून सत्य मानू नका, तर तुमच्या अनुभूतीवर उतरते तेच अंतिम सत्य माना. शेवटी धर्मावर, देशावर निष्ठा ठेवा.’
दीडशे वर्षांपूर्वीचे स्वामीजींचे विचार, शिकवण आजही देशाला नव्हे, तर जगाला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करीत आहे. स्वामीजी म्हणतात, “शब्दांच्या समुद्रापेक्षा आचरणाचा एक थेंब जास्त मौलिक आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक चांगल्या गोष्टीची प्रथम चेष्टा होते, नंतर विरोध होतो अन् शेवटी स्वीकार होतो.”
[email protected]