दैनंदिन आयुष्य जगताना समाज माध्यमात अशा काही घटना घडत असतात की, त्याचा परिणाम समाजावर व मानवी मनावर होत असतो. अशीच घटना महाराष्ट्रातील औरंगाबादमध्ये काही दिवसांपूर्वी ऑनर किलिंग घटना म्हणून समोर आली. बहिणीने प्रेमविवाह केल्यामुळे एका अल्पवयीन भावाने बहिणीला कोयत्याने वार करून ठार केले व शिर धडापासून वेगळे केले. यात या भावाला तिच्या आईने मदत केली. नात्याला काळिमा फासणारी व डोक्याला झिणझिण्या येणारी अशी ही घटना घडली.
मृत महिलेचे नाव किशोरी मोटे (कीर्ती) असे असून शेजारी गावात राहणाऱ्या अविनाश थोरे यांच्यासोबत तिचे अनेक वर्षं प्रेमप्रकरण चालू होते. कॉलेजला जाताना दोघे एकाच बसने प्रवास करायचे. त्यातून त्यांची ओळख निर्माण झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले, नंतर हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. आपली मुलगी कॉलेजला बसने प्रवास करते, म्हणून किशोरीच्या वडिलांनी तिला बुलेट घेऊन दिली. ती बुलेटनेच कॉलेजला ये-जा करू लागली. याच दरम्यान अविनाश आणि किशोरी यांच्यातील प्रेम बहरायला लागले.
या दोघांच्या प्रेमाची कुणकुण जेव्हा किशोरीच्या घरच्यांना झाली, तेव्हा तिच्या घरच्यांनी तिचे कॉलेजचे शिक्षण व येणं-जाणं बंद करून टाकलं आणि तिला घरीच बसवले कारण, किशोरीच्या घरच्यांना हे नातं मान्य नव्हतं. तसंच गेली अनेक वर्षं मोटे व थोरे कुटुंबांमध्ये कौटुंबिक वाद चालू होता. त्यामुळे किशोरीच्या घरच्यांना हे नातं मान्य नव्हतं. पण किशोरी व अविनाश यांना आपल्या प्रेमाशिवाय काही दिसत नव्हतं. त्या दोघांनी ठरवलं की, आपण पळून जाऊन लग्न करायचं. या दोघांनी आपल्या निर्णयानुसार २१ जून २०२१ला आपल्या घरातून पळ काढून पुण्याजवळचे आनंदी गाव गाठले व तेथेच त्यांनी लग्न केलं आणि लग्नाच्या एक महिन्यानंतर ती दोघं आपल्या गावी परतली. अविनाशची शेती होती. ती दोघं शेतात काम करत होती व आपला चरितार्थ चालवत होती व त्यांनी आपल्या सुखी संसाराला सुरुवात केलेली होती.
पळून जाऊन लग्न केले ही गोष्ट तिच्या माहेरच्यांना वर्मी लागली. ते त्यांना सहन झाले नाही. तिच्या वडिलांना तर आपली मुलगी असं काही करेल, यावर अजूनही विश्वास बसत नव्हता व किशोरीच्या अशा वागण्याचा दोष ते किशोरीच्या आईला देत होते. तिनेच आपल्या मुलीला वळण लावले नाही व तिचेच आपल्या मुलीला पाठबळ असणार, असे त्यांना वाटायचे. ते किशोरीच्या आईला नको नको ते शब्द बोलून मारझोड करू लागले होते. हे सर्व किशोरीचा भाऊ बघत होता आणि आपल्या आईला जो मार खावा लागतोय, तो आपल्या बहिणीमुळेच आहे, हे त्याला वाटायला लागले. बहिणीचा संसार सुखी चाललेला आहे व आपल्या आई-वडिलांमध्ये सतत भांडणं होत आहेत, हे त्याला सहन होत नव्हतं.
गावात आपल्या बहिणीमुळे आपल्या घराचं नाव खराब झाले होते, तसे समाजात वावरणे मुश्कील झाले होते, हे सर्व आपल्या बहिणीमुळे होत आहे, याची जाणीव भावाला होत होती. आई व भावाला किशोरीच्या अशा वागण्यामुळे सतत त्रासाला सामोरे जावं लागत होतं म्हणून किशोरीविरुद्ध त्यांच्या मनात तिरस्कार निर्माण झाला. त्याचा परिणाम तिच्या हत्या करण्यापर्यंत गेला. किशोरीची हत्या करण्यापूर्वी तिची आई किशोरीला सासरी जाऊन भेटली होती. चांगल्या गप्पा मारून आलेली होती. त्यामुळे किशोरी आनंदात होती. आता सर्व काही व्यवस्थित होईल, या भ्रमात ती होती. तिला काय माहीत की, आपल्या आईच्या आणि भावाच्या मनात काय शिजत होतं. किशोरीचे पती अविनाश थोरे यांच्या सांगण्यानुसार, किशोरीची आई आणि भाऊ एका आठवड्यानंतर पुन्हा आले. त्या दिवशी किशोरी-अविनाश शेतात काम करत होते. अविनाशला बरं वाटत नव्हतं म्हणून ‘मी घरी जातो. तुही लवकर काम करून घरी परत ये’, असं त्याने आपल्या पत्नीला सांगितले.
अविनाश घरी येऊन आराम करत होते. काही वेळानंतर किशोरी घरी आली होती. थोड्या वेळाने किशोरीने अविनाशला सांगितले की, आई आणि भाऊ घरी आलेला आहे. त्यावेळी अविनाश झोपेतच होते, तेव्हा त्यांना तिने सांगितले की, मी त्यांच्यासाठी चहा ठेवते आणि ती चहा ठेवण्यासाठी स्वयंपाक घरामध्ये गेली. तिच्या भावाने सोबत लपवून आणलेला कोयता घेऊन तिच्यावर स्वयंपाकघरात हल्ला केला आणि काहीतरी पडल्याचा आवाज झाला म्हणून अविनाश स्वयंपाकघरात गेला आणि त्याने बघितल्यावर असे दिसले की, किशोरीच्या आईने तिचे हात-पाय पकडले होते व भाऊ तिच्यावर सतत वार करत होता. अविनाशला तिथे बघितल्यावर त्यांनी त्याच्यावरही वार करण्याचा प्रयत्न केला. पण अविनाश तिथून बाहेर पळाला व त्याने आरडा-ओरडा करून आपल्या नातेवाइकांना तिथे बोलवलं. तोपर्यंत किशोरीचा भाऊ तिचे मुंडके घेऊन व्हरांड्यात आला. किशोरीच्या आई आणि भावाने त्या मुंडक्यासोबत सेल्फी काढली. नंतर तिथेच मुंडकं फेकून ते तिथून पळाले.
या घटनेनंतर पोलिसांनी त्या दोघांनाही पकडले. आई शिक्षा भोगत आहे, तर भावास ज्युवेनाईल कोठडीत सजा सुनावण्यात आलेली आहे. तो जरी अल्पवयीन असला तरी त्याने केलेला गुन्हा अल्पवयीन नव्हता. आई व भावाने केलेला गुन्हा थरकाप आणणारा होता. ते गुन्हेगार आहेतच. पण हा गुन्हा करायला भाग पाडणारे किशोरीचे वडीलसुद्धा तितकेच गुन्हेगार आहेत. मुलीने प्रेमविवाह केला, हे सहन न झाल्यामुळे ते आपल्या पत्नीला व मुलाला सतत त्रास देत होते. या त्रासाला कंटाळून या दोघांनी आपल्या बहिणीचा/मुलीचा बदला घेतला होता.
वडिलांनी जरी हत्या केली नाही, तरी ती करायला या दोघांना भाग पाडलं होतं. किशोरीची जेव्हा हत्या झाली, त्यावेळी ती दोन महिन्यांची गरोदर होती. आई-भावाने एक नाही, तर दोन जीवांची हत्या केली होती. द्वेषाच्या अग्नीत दोन कुटुंबे बरबाद झाली. अविनाशची सुखी संसाराची स्वप्न धुळीस मिळाली. अन् फुलण्याअगोदरच सर्व कोमेजून गेलं.
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…
महिलांना त्यांच्या पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अँकलेट परिधान करायला फार आवडते. विवाहित महिलांसोबतच अविवाहित मुलींनाही अँकलेट…
मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…
बंगळुरू : कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक अर्थात माजी डीजीपी ओम प्रकाश यांची राहत्या घरातच हत्या…
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…