सुकृत खांडेकर
पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यातील मुदगीजवळ मोगा-फिरोजपूर राष्ट्रीय महामार्गावर शेतकरी आंदोलकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रस्ता रोखून धरला. पंतप्रधानांना त्यांच्या ताफ्यासह फिरोजपूर हायवेवरील उड्डाणपुलावर वीस मिनिटे एकाच जागी थांबून राहावे लागले, त्यानंतर त्यांनी माघारी फिरण्याचा निर्णय घेतला आणि भटिंडा विमानतळावर परतल्यावर तेथील पंजाबच्या अधिकाऱ्यांना उद्देशून मोदी म्हणाले, ‘मै एअरपोर्ट तक जिंदा पहुँच पाया, इसलिए अपने सीएम को थँक्स कहना.’
पंतप्रधानांचा पंजाब दौरा काही अचानक ठरलेला नव्हता. ५ जानेवारीला सकाळी साडेदहा वाजता ते दिल्लीहून भटिंडा हवाई दलाच्या विमानतळावर पोहोचले. तेथून ते हेलिकाॅप्टरने फिरोजपूरला शहीद भगतसिंह, राजगुरू व सुखदेव यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जाणार होते, नंतर भाजपच्या रॅलीमध्ये जनतेला संबोधित करणार होते आणि जवळपास चाळीस हजार कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ व भूमिपूजन असाही कार्यक्रम होता. राज्यात काँग्रेसचे सरकार आहे. नरेंद्र मोदी यांना देशातील जनतेने दुसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून दिले आहे. पंजाबात चरणजित सिंग चन्नी हे कॅप्टन अमरिंदर सिंग यांना हटवून मुख्यमंत्रीपदावर बसले आहेत. राजशिष्टाचाराप्रमाणे त्यांनी पंतप्रधानांचे स्वागत करण्यासाठी भटिंडा विमानतळावर जायला हवे होते. पण त्यांच्या कार्यालयातील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे कारण सांगून त्यांनी मोदींचे स्वागत करण्यापासून पळ काढला. मोदींच्या पंजाब दौऱ्यात चन्नी हे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारीने वागले नाहीत, हेच नंतर दिसून आले.
खराब हवामान व पाऊस यामुळे हेलिकाॅप्टर फिरोजपूरला जाणार नाही, हे स्पष्ट झाल्यावर पंतप्रधानांच्या सुरक्षाव्यवस्थेतील एसपीजींनी तातडीने पंजाब पोलिसांशी संपर्क साधला व मोटारीने फरिदकोट-मोगा हायवेवरून फिरोजपूरला जाण्यासंबंधी कळवले. त्याला पंजाब पोलिसांनी हिरवा कंदीलही दिला. मोदींच्या दोन तासांच्या मोटारीच्या प्रवासात सुरक्षा व्यवस्था घेण्याची जबाबदारी पंजाब पोलिसांवरच होती. पंतप्रधानांच्या ताफ्याबरोबर राज्याचे पोलीस महासंचालकही नव्हते. दुपारी एक वाजून ४० मिनिटांनी हा ताफा उड्डाणपुलावर पोहोचला, तेव्हा प्यारेना गावाजवळ शेतकरी आंदोलक झेंडे व बॅनर्स घेऊन जमले होते व त्यांनी पंतप्रधानांच्या मार्गातच ठिय्या मांडला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री चन्नी यांच्याशी तातडीने संपर्क साधण्याचा प्रयत्नही झाला. पण त्यांनी साधा फोनही घेतला नाही. देशाच्या घटनेने सर्वोच्च अधिकार दिलेल्या सर्वोच्च शक्तिमान व्यक्तीचा रस्ता रोखला गेला असताना त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना त्याचे गांभीर्य वाटले नाही.
पंजाब हे देशाच्या सरहद्दीवरील संवेदनशील राज्य आहे. पाकिस्तानच्या सीमेवर असलेल्या राज्यात जर पंतप्रधानांनाही राज्याकडून सुरक्षा मिळत नसेल, तर आम आदमीने कोणावर भरवसा ठेवायचा? चंडीगढ, अमृतसर, जालंधर, पटियाला, फिरोजपूर, संगरूळ, लुधियाना, नांगल, भटिंडा, मोहाली अशी संवेदनशील शहरे या राज्यात आहेत. व्हीव्हीआयपींच्या सुरक्षिततेसाठी पंजाब पोलिसांची स्वतंत्र यंत्रणा राबत असते, मग देशाच्या पंतप्रधानांना साधा रस्ता मोकळा करून देता आला नाही, यास जबाबदार कोण? पंजाबच्या पोलीस व प्रशासनाची सर्व देशात नाचक्की झाली. पंजाबमधील चन्नी सरकारचे प्रशासनावर नियंत्रण नाही, हे स्पष्ट झाले.
पंजाबमधील सरकार सुरक्षिततेच्या प्रश्नावर किती कमकुवत आहे, हे देशाला दिसून आले. पंजाबमध्ये व्हीआयपींच्या सुरक्षा व्यवस्थेत सात हजार पोलीस आहेत. पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी दहा पोलीस तैनात केले होते, असे सांगतात. पण पंतप्रधानांचा रस्ता रोखणाऱ्या आंदोलकांना ते अडवू शकले नाहीत, यापेक्षा दुर्दैव कोणते? पंतप्रधान महामार्गाने जाणार आहेत, असा डंका नेत्यांनी गावागावांतून पिटला. सोशल मीडियावरून निरोप पाठवून आंदोलकांना जमा करण्यात आले. पोलिसांना हे कळत नव्हते काय?
पंतप्रधान मोटारीने फिरोजपूरला जाणार, हे एसपीजी व पोलीस यांनाच ठाऊक होते. पोलिसांनी त्याला होकार दिला होता, मग ही माहिती आंदोलकांपर्यंत कशी पोहोचली, कशी फुटली, कोणी पुरवली? पंतप्रधान कोणत्या मार्गाने घटनास्थळी पोहोचणार ही माहिती गोपनीय राखली जाते. तो रस्ता पूर्ण मोकळा ठेवणे, स्वच्छ ठेवणे, त्या परिसराचे निर्जंतुकीकरण करणे, संशयितांना ताब्यात घेणे हा सर्व कायदा व सुव्यस्थेचा भाग असतो. पंजाब सरकारने त्याची दक्षता घेतली नाही, नियमांचे काटेकोर पालन केले नाही. हलगर्जीपणा व अक्षम्य ढिसाळपणा यामुळे पंतप्रधानांना दौरा सोडून माघारी परतावे लागले.
केंद्राने केलेले कृषी कायदे रद्द व्हावेत म्हणून पंजाबमधील शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर वर्षभर ठिय्या मांडून आंदोलन केले होते. तेव्हा आंदोलकांना दिल्लीत येऊ दिले नाही म्हणून शेतकऱ्यांनी पंतप्रधानांचा रस्ता अडवला, असा युक्तिवाद केला जातो आहे. पंतप्रधानांनी हेलिकाॅप्टरने जाण्याऐवजी ऐनवेळी मोटारीने जाण्याचे ठरवले, असेही कारण पंजाबचे मुख्यमंत्री सांगत आहेत. आम्हाला कळवले असते, तर आम्ही तयारी केली असती, अशी भाषा बोलत आहेत. जो मुख्यमंत्री देशाचे पंतप्रधान अडकले असताना फोनही घेत नाही, त्याच्या तोंडी अशी भाषा शोभत नाही. चन्नी मुख्यमंत्री म्हणून आपल्या कर्तव्याला साफ चुकले. ज्या राज्यात पंतप्रधान जातात, तेथील सुरक्षाव्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी ही त्या राज्य सरकारवर असते. हे चेन्नींना ठाऊक नसेल, तर त्या पदावर राहण्यास ते अपात्र आहेत. शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांवर पोलीस गोळाबार करू शकत नाहीत व पंतप्रधानांच्या सुरक्षाव्यवस्थेत काहीही त्रुटी नव्हत्या, असे सांगण्याची हिम्मत चन्नी कशी करू शकतात?
पंजाबचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) यांनी पोलिसांना चार वेळा पत्र पाठवून पंतप्रधान भेटीच्या वेळी आंदोलकांवर लक्ष ठेवा, असे स्पष्ट सांगितले होते. रस्ते बंद केले जातील, असा इशारा दिला होता. पंतप्रधानांच्या मार्गावरील सुरक्षा चोख ठेवा, असे बजावले होते. त्या सूचनांचे पालन का झाले नाही? फिरोजपूरला रॅलीला येणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांच्या बसेस पोलिसांनी ठिकठिकाणी अडवल्या. बसेस, रिक्षा, टेम्पोवरील भाजपची पोस्टर्स आंदोलकांनी फाडली. भाजपचे झेंडे उतरवले. मोदींच्या रॅलीला भाजपचे कार्यकर्ते पोहोचणार नाहीत, यासाठी पोलीस व आंदोलकांनी चंग बांधला होता आणि दुसरीकडे पंतप्रधानांच्या मार्गावर रस्ता रोको करणाऱ्या आंदोलकांबरोबर गप्पा मारत चहाचे घुटके घेताना पोलिसांचे व्हीडिओ व्हायरल झाले आहेत.
अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवासन यांनी ट्वीट करून ‘मोदीजी, हाऊज द जोश?’ असा प्रश्न विचारला आहे. ‘यह कर्मों का फल हैं’, अशी पुष्टी जोडली आहे. याचा अर्थ पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या जीवावर जे बेतले, ते काँग्रेसला हवे होते का? पंजाबमध्ये पंतप्रधानांवर जे संकट आले त्यावर सर्व देशभर संतप्त भावना प्रकट झाल्या. पंजाबच्या पोलीस प्रशासनाचा धिक्कार झाला. चन्नी सरकारचा निषेध झाला. देशाच्या पंतप्रधानांच्या जीवाला धोका देण्याचा प्रयत्न पंजाबमध्ये झाला. पण देशातील जनता भक्कमपणे त्यांच्या पाठीशी आहे. ‘टायगर अभी जिंदा है…!’
[email protected]