ठाणे : ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची कोरोना चाचणी शनिवारी पॉझिटिव्ह आली. सध्या ते गृह विलगीकरणात आहेत.
नार्वेकर यांनी म्हटले आहे की, प्रकृती उत्तम असून कोरोनावर मात करून लवकरच जनतेच्या सेवेसाठी हजर होईन. गेल्या काही दिवसात संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तात्काळ कोरोना चाचणी करावी.
नार्वेकर यांनी याआधी रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांत काम केले आहे. ते रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. ग्रामीण भागात त्यांनी स्वच्छ भारत आणि पंतप्रधान आवास योजना प्रभावीपणे राबवल्या. त्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाच्या कालखंडात रायगड जिल्हा हागणदारीमुक्त झाला. त्यानंतर त्यांनी २०१८ मध्ये मुख्यमंत्र्यांचे सहसचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यानंतर त्यांची बदली ठाण्याच्या जिल्हाधिकारीपदी झाली.