बीड : बीडमध्ये बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. तर आठ जण जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की, बस आणि ट्रक अक्षरश: एकमेकांमध्ये घुसले होते. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून जखमींना अंबाजोगाईमधील स्वामी रामातीर्थ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीडमधील लातूर-अंबाजोगाई मार्गावर सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास लातूरहून औरंगाबादला निघालेल्या एसटीचा अपघात झाला. अंबाजोगाईमध्ये वळणावर एसटी आणि ट्रकने एकमेकांना जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण आहे की, बचावकार्यासाठी घटनास्थळी क्रेन बोलवावी लागली आहे. या दुर्घटनेनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे.