राकेश जाधव
एखादा चित्रपट मनोरंजक होण्यासाठी काय गरजेचं असतं? एक उत्तम कथा, त्याला न्याय देऊन गुंतवून ठेवणारी वेगवान पटकथा0705, उत्तम दिग्दर्शन, सर्वांचा नैसर्गिक अभिनय आणि जमलंच तर चांगलं संगीत, प्रमोशन इत्यादी. कधी काळी या साऱ्या गोष्टी हिंदी चित्रपटांमध्ये ठासून भरलेल्या असायच्या. त्यामुळे ते चित्रपट बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धो धो चालायचे. अशाच चित्रपटांमुळे हिंदी चित्रपटसृष्टीला नावाजलं गेलं आणि इथल्या कलाकार व तंत्रज्ञांना अनेक सुपरस्टार मिळाले. पण गेल्या काही वर्षांत बॉलिवूडला काय झालंय कुणास ठाऊक? अनेकजण दुसऱ्या एखाद्या भाषेतील (विशेषत: दाक्षिणात्य!) सुपरहिट चित्रपटाचा रिमेक करतात आणि बॉक्स ऑफिसवर आरामात १००-२०० कोटींची कमाई करून १०० क्लबमध्ये सामील होतात. पण आता हाही फॉर्मुला फेल होताना दिसतोय. यामागे अनेक कारणं आहेत.
इंटरनेटचा पसारा अत्यंत मर्यादित स्वरूपाचा असताना बिनदिक्कतपणे कोणत्याही चित्रपटाचा केलेला (ऑफिशिअल अथवा अनऑफिशिअल) रिमेक शब्दश: ‘खपला’ जायचा. पण जसजसा इंटरनेटचा पसारा वाढला आणि हातातल्या मोबाइलवर चित्रपट पाहण्याची सोय उपलब्ध झाल्यावर दाक्षिणात्य चित्रपट पाहणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली. त्यामुळे दक्षिणेच्या राज्यांमध्ये प्रसिद्ध असलेले स्टार देशाच्या इतर भागांतही तितकेच प्रसिद्ध होऊ लागले. त्यामुळे त्यांच्या चित्रपटांची क्रेझ उत्तर भारतातील प्रेक्षकांमध्येही कमालीची वाढली.
‘तेरे नाम’सारखा हिट चित्रपट दिल्यानंतर सुपरस्टार सलमान खानचे त्यानंतरचे अनेक चित्रपट धाड धाड आपटत होते. त्याचवेळी त्याच्या मदतीला आला ‘वॉन्टेड.’ दाक्षिणात्य ‘वॉन्टेड’चा हा ‘फ्रेम टू फ्रेम’ कॉपी चित्रपट होता. या चित्रपटानं सलमानच्या करिअरला नवा आयाम दिला. त्यानंतर बॉलिवूडमध्ये दाक्षिणात्य चित्रपटांच्या रिमेकची लाटच आली. त्यातील ‘गझनी’, ‘दृश्यम’ आणि ‘कबीर सिंग’सारख्या चित्रपटांनी करोंडोंची कमाई केलीही, पण अनेक रिमेक चित्रपटांनी हसं करून घेतलं.
दुसरीकडे, अनेक दाक्षिणात्य चित्रपटांचे ऑफिशिअल हिंदी डब चित्रपट यू-ट्युबच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचले आहेत. त्यांना मिळणारे ‘व्ह्यूव्ज’ अनेक मिलियनच्या संख्येत आहेत. यातील काही ठळक उदाहरणे म्हणजे ‘९६’, ‘विक्रम वेधा’, ‘मजिली’, ‘जर्सी’, ‘रत्सासन.’ अशा दमदार चित्रपटांमुळेच दाक्षिणात्य सुपरस्टार संपूर्ण भारतभर प्रसिद्ध आहेत. रजनीकांत, चिरंजीवी, नागार्जुना यांचे ‘फॅन’ खूप आधीपासूनच प्रसिद्ध होते. आता या यादीत प्रभास, अल्लू अर्जुन, धनुष, सूर्या, महेशबाबू या अभिनेत्यांसह अनुष्का शेट्टी, समंथा, रश्मिका मंदाना, नयनतारा, साई पल्लवी या अभिनेत्रींचाही वेगळा ‘फॅन बेस’ संपूर्ण देशभर तयार झाला आहे. दुसरीकडे, मूळ दाक्षिणात्य भाषेत प्रदर्शित झाल्यानंतर काही महिन्यांनी हिंदीत डब केलेला चित्रपट प्रदर्शित होण्याचा पायंडा एस. एस. राजामौली यांच्या ‘बाहुबली’नं मोडला आणि संपूर्ण बॉलिवूडला पहिला हादरा बसला. कल्पनेपलीकडचं विश्व दाखवणाऱ्या राजामौलींनी ‘बाहुबली’द्वारे दाक्षिणात्य चित्रपट ‘पॅन इंडिया’ स्तरावर प्रदर्शित करण्याला सुरुवात केली आणि मनोरंजनाचं एक नवं दालन प्रेक्षकांसाठी खुलं झालं.
हा प्रयोग इतका यशस्वी ठरला की, ‘कटप्पा ने बाहुबली को क्यों मारा?’ या प्रश्नाच्या उत्तरासाठी दोन वर्षे प्रेक्षकांनी आपला संयम धरून ठेवला आणि त्याचं ‘ग्रँड’ फळ त्यांना मिळालं. यानंतर अनेक दाक्षिणात्य चित्रपटांनी बॉलिवूडच्या प्रेक्षकांना आपल्याकडे वळवण्यात यश मिळवलं. ‘जय भीम’ हे त्याचं एक दमदार उदाहरण. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे चित्रपटगृहे बंद असल्यानं ओटीटीद्वारे दाक्षिणात्य भाषांसह हिंदीतही प्रदर्शित झालेल्या सूर्याच्या ‘जय भीम’नं प्रेक्षकांचं प्रेम मिळवण्याचा विक्रम केला आणि आयएमडीबीवर सर्वाधिक रेटिंग मिळवणारा चित्रपट ठरला. याच्या पुढचं पाऊल अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा : द राइज’नं टाकलं आणि ‘स्पायडरमॅन’, ‘८३’ अशा चित्रपटांना धोबीपछाड देत बॉक्स ऑफिसवर कोटींच्या कोटी उड्डाणे घेतली. (कोरोनामुळे सध्या तरी राजामौली यांच्या ‘आरआरआर’ आणि प्रभासच्या
‘राधे श्याम’चं प्रदर्शन लांबलं आहे. हाच काय तो तात्पुरता बॉलीवूडला दिलासा!)
बॉलिवूड मात्र रिमेकच्या धुंदीतून बाहेर पडायला अजूनही तयार नाही. बॉलिवूडवाल्यांना अजूनही वाटतं की, आपण एखाद्या सुपरहिट चित्रपटाचा रिमेक केला की, १०० करोड क्लबमध्ये आरामात जाता येईल. पण हा किती मोठा गोड गैरसमज आहे, हे गेल्या काही वर्षांतील ‘धडक’(‘सैराट’चा रिमेक), ‘लक्ष्मी’ (‘कांचना’चा रिमेक), ‘अंतिम’ (‘मुळशी पॅटर्न’चा रिमेक) या बॉक्स ऑफिसवर तोंडघशी पडलेल्या चित्रपटांवरून समजून येते. त्यामुळे आतातरी बॉलिवूडनं स्वत:ला सुधारून ‘दक्षिणेची वारी’ आपल्यावर भारी होणार नाही, याची काळजी घ्यावी.