नवी दिल्ली/इंदूर : बुल्लीबाई अॅप नंतर आता सुल्ली डील अॅप प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मोठी कारवाई केली आहे. हे अॅप तयार करणारा मास्टरमाईंड ओंकारेश्वर ठाकूर (वय २५ वर्षे) याला इंदूरमधून पोलिसांनी अटक केली आहे. बुल्लीबाई अॅप प्रकरणात अटक केलेल्या नीरज बिष्णोईकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
सहाय्यक पोलीस उपायुक्त यांनी दिलेल्या माहितीनूसार, ओंकारेश्वर हा जानेवारी २०२० साली @gangescion या ट्विटर हँडलवरुन ट्रेड महासभा ग्रुप मध्ये सहभागी झाला होता. या ग्रुपमध्ये मुस्लीम महिलांना ट्रोल करण्याबाबत चर्चा होत असे. त्यानंतर त्याने सुल्ली डील अॅप गिटहबवर बनवले. ज्यावेळी सुल्ली डील अॅप वरुन देशात गदारोळ सुरु झाला, तेव्हा त्याने आपली सर्व माहिती सोशल मीडियावरुन काढून टाकली. बुल्ली बाई अॅप प्रकरणी अटक करण्यात आलेल्या नीरज बिष्णोईने सुल्ली डील अॅप प्रकरणातील आरोपींशी त्याचे संबंध असल्याचे सांगितले.
या माहितीवरुन दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने इंदूरमध्ये छापा टाकून तेथून ओंकारेश्वर ठाकूरला अटक केली. २५ वर्षीय ओंकारेश्वरने इंदूर येथील आयपीएस अकादमीतून बीसीए केले आहे.