Sunday, July 14, 2024

खरी कमाई

रमेश तांबे

एक होता राजू. त्याला खायचा होता पिझ्झा! पण कुणीच त्याला पिझ्झा देईना. सगळ्यात पहिला तो गेला आईकडे आणि म्हणाला, ‘आई, आई… पिझ्झा मागव ना!’ तशी आई त्याच्यावर ओरडली, ‘काही मिळणार नाही पिझ्झा… बिझ्झा! त्यापेक्षा भाजी-चपाती खा!’
बिच्चारा राजू…!!

मग तो गेला बाबांकडे आणि म्हणाला, “बाबा, बाबा तुम्ही किती हॅण्डसम दिसता… किती छान बोलता… तुम्ही ना… मला खूप आवडता!” बाबांनी राजूचं नाटक बरोबर ओळखलं अन् म्हणाले, ‘हं बोल राजू… काय हवंय तुला?’ ‘बाबा, बाबा मला ना पिझ्झा खायचाय. तो चिजवाला… माझ्या खूप खूप आवडीचा!’ बाबा म्हणाले, ‘आता नको, नंतर बघू!’ बिचारा राजू अगदीच हिरमुसला. पण काय करणार!
मग राजू गेला ताईकडे आणि म्हणाला, ‘ताई, ताई मला पिझ्झा हवा. तू पिझ्झा दिलास तर तुझी सगळी कामे करीन. तुझ्यासोबत रोज अभ्यासाला बसेन.’ राजूचे बोलणे ऐकून ताई गालातल्या गालात हसत म्हणाली, ‘जा रे खोटारड्या, मी चांगलीच ओळखते तुला… गोड-गोड बोलण्याला नाही फसायचं मला!’

राजूला आता प्रश्न पडला, आपण पिझ्झा कसा खायचा? मग राजूला त्याचा पैशाचा डबा आठवला. त्याने तो झटपट फोडला अन् त्यातले पैसे भरभर मोजले. पण फक्त बावीस रुपयेच मिळाले. पैसे खिशात ठेवून तो घराबाहेर पडला. फिरता-फिरता त्याला एका ठिकाणी पिझ्झा हट दिसले. काचेच्या कपाटात ठेवलेले वेगवेगळे पिझ्झे बघून राजूच्या तोंडाला तर पाणीच सुटले. मग तो धावतच त्या दुकानात शिरला. एक जाडजूड माणूस त्या दुकानाचा मालक होता. तो मोठ-मोठ्याने बोलत होता. नोकरांना भरभर हात चालवायला सांगत होता. घाबरत घाबरतच राजू म्हणाला, ‘काका, काका पिझ्झा केवढ्याला? मालक ओरडला, ‘पन्नास रुपये!’ राजूने खिशातले सर्व पैसे काढून मालकाला दिले. मालकाने ते भरभर मोजले. कमी पैसे बघताच मोठ्याने हसून म्हणाले, ‘पन्नास रुपये लागतात एका पिझ्झ्याला!’ काही मिळणार नाही एवढ्या पैशाला!’ मग राजू म्हणाला, ‘काका प्लिज, काका प्लिज… बघा ना काही जमतंय का?’

मालक म्हणाला, ‘एक आयडिया आहे माझ्याकडे! दोन तास काम कर आमच्या दुकानात आणि त्याच्या बदल्यात मी तुला एक पिझ्झा देईन!’ राजूने थोडा विचार केला अन् दुकानात काम करायला तयार झाला. मग मालकाकडून त्याने काम समजावून घेतले. दुकानात काम करण्यासाठी छान असा गणवेश होता. पांढरे शुभ्र शर्ट, पॅन्ट, त्याच रंगाचे हात मोजे अन् टोपीही! या वेशभूषेची त्याला खूप मजा वाटली. पण दोनच तास काम करायचे असल्याने तो गणवेश काही त्याला मिळाला नाही. आता राजू आल्या गेलेल्यांना पिझ्झा देऊ लागला. रिकाम्या डिश उचलू लागला. टेबलवर फडका मारू लागला. काम करता-करता राजू चांगलाच घामाघूम झाला. दोन तास कसे गेले त्याला कळलेच नाही. राजूच्या कामाची वेळ संपताच मालकाने त्याला बोलावून घेतले. मालक त्याच्या कामावर भलतेच खूश झाले होते. त्यांनी राजूला एक ऐवजी दोन पिझ्झे दिले. राजूला खूपच आनंद झाला. दोन दोन गरमागरम पिझ्झे बघताच त्याची भूक चाळवली. पण पिझ्झे इथेच बसून खावे की, घरी न्यावेत याचा विचार मनात येताच त्याला आई आठवली अन् तो तडक घरी निघाला.

राजू घरी आला, तेव्हा बाबा पेपर वाचत बसले होते. आईचा स्वयंपाक आणि ताईचा अभ्यास सुरू होता. राजूला बघताच बाबा म्हणाले, ‘कुठे होतास एवढा वेळ… तीन तास झाले तुला बाहेर जाऊन?’ मग राजूने घडलेली सगळी गोष्ट आई, बाबा आणि ताईला सांगितली. साऱ्यांनी ती मन लावून ऐकली. राजू म्हणाला, “बाबा आज मला कामाचे महत्त्व समजले. पैशावरून तुमचे ओरडणे आणि नासधुशीबद्दल आईचे बोलणेही कळले.”

बाबा मला दोन तास काम केल्याचे फक्त दोनच पिझ्झे मिळाले. आज मला घामाचे, श्रमाचे मोल समजले. मग साऱ्यांनी मिळून
पिझ्झा खाल्ला. सगळ्यांना मोठा आनंद झाला. खरंच दोन तासांनी चमत्कार केला. आपला राजू मोठा झाला!
meshtambe@rediffmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -