प्रियानी पाटील
अभिनय क्षेत्र म्हणजे ग्रामीण भागातील मुलींना तसे पारखेच. अभिनय क्षेत्रात करिअर करायचे असेल, तर एकतर संधीची वाट पाहावी किंवा शहराचा रस्ता धरावा, त्यातूनही ओळखी, आॅडिशन आिण त्यातूनही निभाव लागला, तर नशिबात मग लाइट, कॅमेरा आिण अॅक्शन…! हे शब्द वारंवार कानावर यायला लागले की, मग समजून जावं, हेच ते क्षेत्र की, जेथे करिअर दडलं आहे आिण स्वप्नपूर्तीचा मार्गही.
दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा अभिनय मनात फिट्ट बसवणारी, अभिनयाला ओतप्रत करणारी, सिंधुदुर्गात (तळेरे-विजयदुर्ग) जन्म आिण तिथेच आपली ओळखही निर्माण करणारी सिंधुदुर्गची सुकन्या अभिनेत्री प्राजक्ता वाडये झी मराठीवर गाजत असलेल्या ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेमधून सरिताच्या भूमिकेतून आज घराघरांत पाेहोचली आहे. सुरुवातीला डान्स, मग एकांकिका स्पर्धा यातून पुढे सरकत सरकत अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवताना प्राजक्ताला सरिताची मिळालेली भूमिका आज रात्रीस खेळ चाले या मालिकेमध्ये स्वत:ची वेगळी अशी ओळख निर्माण करणारी ठरली आहे.
प्राजक्ता सांगते, सुरुवातीला नोकरी करण्याचाही प्रयत्न केला, पण नाही जमले. पण नंतर अभिनयाच्या मिळालेल्या संधीमुळे प्रोफेशनली या क्षेत्रात वळले. शॉर्ट फिल्मसच्या माध्यमातून काम केले. सुरुवातही ‘रात्रीस खेळ चाले’ सीरियलमधून झाली, हंड्रेड डेजमध्ये एक छोटी भूमिका केली होती, गर्ल्स हॉस्टेलमध्ये पूर्ण कॅरेक्टर प्ले केले. दिशा नावाची एक फिल्म आहे, ज्याला गोवा मराठी फिल्म फेस्टिव्हलचे अॅवॉर्ड मिळाले आहे. प्राजक्ताच्या अभिनयाचा हा प्रवास म्हणजे तिचा ध्यासच म्हणावा लागेल. ‘रात्रीस खेळ चाले’ सीरियलविषयी बोलताना, सरिताचे ऑडिशन मुंबईत झाले, दोन-तीन ऑडिशननंतर सिलेक्शन झाले. लूकवाईज आणि मालवणी भाषा यामुळे ही संधी मिळाल्याचे प्राजक्ताने सांगितले.
अभिनय क्षेत्र छान वाटते, आवडीचे क्षेत्र असल्याने सिंधुदुर्गात मिळालेली संधी पाहता, अभिनय करण्यासाठी, करिअर करण्यासाठी मुंबईचा वेध घेतला जातो, पण माझा प्रवास उलटा झाला, मी मुंबईतून गावाकडे आले अाणि अभिनय आता सिंधुदुर्गच्या मातीत रुजला.
लॉकडाऊनमुळे काही वेळ खंड पडला. संधी कधी कधी हुकतात, टॅलेंट असून मुलींना पुढे येता येत नाही, यावर प्राजक्ता सांगते, जेव्हा पुढे यायची वेळ येते, तेव्हा आपण स्वत:ला सिद्ध केले पाहिजे. संधी मिळाल्यावर कुठे कमी न पडता, ती संधी मिळवता आली पाहिजे. आत्मविश्वास ठेवायला पाहिजे. अभिनय हा आतून येणं गरजेचं आहे. प्राजक्ताला अॅक्शन मुव्ही, बायोग्राफी करायच्या आहेत. अभिनयात आपले स्थान अजून पक्के करण्याचा तिचा मनसुबा आहे. कोणत्याही क्षेत्रात आवड असली की, आपोआप आपण भरभरून त्या क्षेत्राला न्याय देतो, असं ती सांगते.
आजच्या तरुणींनीही पॅशन आिण करिअर याची सांगड घातली की, यश, समाधानाचा मार्ग आपसूकच सापडत असल्याचे प्राजक्ता सांगते.
कॉमेडीकडेही वळायचे आहे. सरिताची भूमिका मनापासून भावली आहे. अॅक्टर म्हणून खूप काम करावे लागले. ही भूमिका करताना खूप शिकायला मिळाले आहे. सरिताच्या आयुष्यात झगडण्याची प्रवृत्ती अाहे. रोज तिच्या आयुष्यात काहीना काही विषय आहेत. ती कुटुंबात स्वत:साठी भांडते आहे. प्रत्येक सीनला, पावला-पावलांवर सरिताची भूमिका काही तरी वेगळे सांगणारी आहे.
सीरियल म्हटली की, क्रिएटिव्हिटी संपते असं म्हणतात, पण ‘रात्रीस खेळ चाले’ सीरिअल करताना असे अजिबात जाणवत नाही. आपण सीरियलच्या माध्यमातून रोज घराघरांत पाेहोचतो. नवं करण्याची संधी मिळते, प्रेक्षक यातून व्यक्त होतात. यातूनच अभिनय सार्थकी लागतो, काम केल्याचे समाधान मिळते, असे प्राजक्ता सांगते.
सीरियलमध्ये सरिता फार बोलताना दिसते, त्या आनुषंगाने ‘सरिता बोलता म्हणून तेचा ताँड दिसता’ त्याचप्रमाणे ‘गे बाय माझे…’ असे काही डायलॉग तिचे फेमस आहे. सरिताची भूमिका जोवर सोशिक सून होती, तोवर लोकं आवर्जून भेट घेत असत. पण जसजशी सरिता या भूमिकेत कॅरेक्टरवाइज चेंजेस होत गेले, ती सोशिकतेतून जशी कजाग होत चालली तसतशी लाेकं लांबूनच हात दाखवतात. पहिले अंदाज घेतात अाणि मगच हाक मारतात. सोशिकतेतून बिनधास्तपणाकडे झालेला सरिताचा हा प्रवास आहे.
सरिता साकारणारी प्राजक्ता रिअल लाइफमध्ये फार वेगळी आहे. स्टोरी आिण रिअल लाइफ यात फरक असताेच. स्त्रीयांनी सहन करत बसणं, नमतं घेणे या गोष्टी तिला न पटणाऱ्या आहेत. स्त्रीला स्वत:चं मत असावं या विचारांची प्राजक्ता भूमिकेशी ठाम आहे. सोशिक सरितापेक्षा अन्याय सहन न करणारी सरिता मनापासून साकारली जात असल्याचे प्राजक्ता आवर्जून सांगते. अभिनयाच्या प्रवासात सरिता म्हणून मिळालेली भूमिका ही सिंधुदुर्गच्या मातीत प्राजक्ताला एक नवी ओळख निर्माण करून देणारी ठरली आहे.
[email protected]