Wednesday, July 24, 2024
Homeसाप्ताहिककोलाज‘दो एक पल, और हैं ये समा...’

‘दो एक पल, और हैं ये समा…’

श्रीनिवास बेलसरे

देव आनंदचा १९५२ला आलेला ‘जाल’ खूप लोकप्रिय झाला. त्या वर्षी सर्वात जास्त उत्पन्न मिळवणाऱ्या सिनेमात तो तिसऱ्या क्रमांकाचा सिनेमा ठरला. गीता बाली नायिका असलेला हा सिनेमा दिग्दर्शित केला होता गुरुदत्तने! भारतीय चित्रपटसृष्टीत खलनायकी छटा असलेले नायक सादर करण्याची परंपरा या सिनेमाने प्रथमच सुरू केली. ती जास्त प्रचलित झाली ती ७०च्या दशकापासून!

गोव्यातील एका खेड्यातली कथा असलेल्या ‘जाल’मधील बहुतेक पात्रे ही छोट्या बंदरावरच्या वस्तीत असतात तशी व्यापारी, कोळी, दर्यावर्दी आणि तस्करीशी संबंधित होती. गोव्याच्या पार्श्वभूमीमुळे असेल कदाचित चित्रपटात खास ख्रिस्ती धर्माशी जोडलेली क्षमाशीलता आणि निरपेक्ष प्रेम ही मूल्ये गुंफलेली होती.

देव आनंद (टोनी फर्नांडिस) एक सराईत गुन्हेगार असतो आणि त्याने यापूर्वी त्याच्या पहिल्या प्रेयसीला फसवलेले असते. त्याचा तोच इरादा गीता बालीच्या (मारिया) बाबतीतही असतो. मात्र सिनेमाच्या शेवटी तिच्या निरपेक्ष प्रेमामुळे त्याला उपरती होऊन तो स्वत:ला कायद्याच्या स्वाधीन करून देतो, अशी कथा होती.

साहिरच्या गीतांना सचिनदेव बर्मन यांनी संगीत दिले होते. यातील एक गाणे अतिशय लोकप्रिय झाले होते. वेगवेगळ्या वेळी लतादीदी आणि हेमंतकुमारने गायलेल्या या गाण्यांपैकी हेमंतकुमारच्या आवाजातले गाणे जास्त लोकप्रिय झाले. रात्रीची निवांत वेळ, मंदपणे चमकणारे चांदणे आणि थंड हवा सुटलेला शांत आसमंत! अशा काहीशा धुंद वातावरणात प्रियकर प्रेयसीला भेटायला बोलावतो आहे, साद घालतो आहे अशी कल्पना! त्याला जाणवत असलेली तिला भेटण्याची आतुरता सांगतानाच जीवनाचे क्षणभंगुरत्व सांगून तो तिला जणू आळवतो आहे –
ये रात, ये चाँदनी फिर कहाँ, सुन जा दिलकी दास्ताँ…

जुन्या काळी फारसे ‘धंदेवाईक गीतकार’ नव्हतेच. होते ते कवीच! त्यांनाच गीतकार करण्यात आल्याने त्यांच्या गाण्यातही कवितेसारख्या ताज्या टवटवीत, ओलसर उपमा, सुंदर कल्पना आणि भावविभोर भावविश्व वारंवार दिसायचे. ‘चांदणे झाडांच्या फांद्यांवर झोपी गेले आहे’ ही कसली कोमल उपमा! ती काही ठरवून लिहिलेल्या गाण्यातली उपमा असू शकत नाही. ते खास साहिरचे शायराना अंदाजातील शब्द! शेवटी तो साहिर होता! त्यामुळे तो म्हणतो चांदणेही तुझ्या आठवणींत हरवले आहे –

पेड़ोंकी शाखोंपे सोई सोई चाँदनी
तेरे खयालोंमें खोई खोई चाँदनी..
और थोड़ी देरमें थकके लौट जाएगी
रात ये बहारकी फिर कभी न आएगी
दो एक पल और है ये समा, सुन जा…

तुला भेटायला मन अगदी आतुर झाले आहे. कारण प्रिये, आज जे आहे ते उद्या असेलच असे नाही ना! तुझी वाट पाहून हे शीतल चांदणे, ही वसंतातली मुग्ध रात्र कदाचित निघून जाईल आणि पुन्हा कधीच परतणार नाही. आता फक्त एक-दोन क्षणच शिल्लक आहेत. त्यानंतर ही संधी पुन्हा मिळणार नाही..! सचिनदांनी दिलेल्या संथ चालीत जेव्हा हे शब्द येतात तेव्हा आपणही मनातल्या मनात त्या धुंद रात्रीच्या वातावरणात जातो –

लहरोंके होंठोंपे धीमा धीमा राग है
भीगी हवाओंमें ठंडी ठंडी आग है..
इस हसीन आगमें तू भी जलके देख ले…
ज़िंदगीके गीतकी धुन बदलके देखले
खुलने दे अब धड़कनोंकी ज़ुबाँ, सुन जा…

प्रेयसीला केलेले हे साहिरचे आवाहन किती लाघवी, नाजूक, हळुवार आणि नकळत किती प्रभाव टाकणारे आहे पाहा. तो म्हणतो – हवेच्या झुळकांतून ऐकू येणारा राग संथगती आहे. ओलीकंच वाटावी अशी हवा माझ्या मनात एक थंड थंड अशी आग पेटवते आहे. तिच्यात जळण्याची मजा तुही अनुभवून तर बघ, राणी! तुझ्या जगण्याचा सगळा तालच बदलून जाईल. तुझ्या अबोल हृदयातील स्पंदनांना शब्दरूप मिळेल आणि तुला पूर्णपणे व्यक्त होता येईल!
हे असले आर्जवी, काव्यमय आवाहन कोणत्या युवतीला घरी अडकवून ठेवू शकेल? किंबहुना किती आवेगाने ती त्याच्या भेटीसाठी बाहेर खेचली जाईल त्याची कल्पनाच केलेली बरी!

प्रिये, तू लवकर ये. आता ही बहार निघून जायच्या बेतात आहे. तारुण्याची धुंदी काही अमर नसते. चांदण्यांच्या सावलीत घडणाऱ्या रम्य, गोपनीय कथासुद्धा काही रोज घडत नसतात! यांचे लोभस निमंत्रण नेहमी येत नसते. हे वसंतातले काफिले तुला एकदाच पुकारतील. मग ते त्यांचा मुक्काम हलवतील. परत आपल्याकडे कधीच फिरकणार नाहीत. म्हणून तू तारुण्याचा तजेला शिल्लक आहे तोवरच ये. तोवरच तुझ्या माझ्या भेटीला अर्थ आहे, आपल्या मीलनाला आवेग आणि जगण्यात आनंद असणार आहे! असे मोहक, कुणालाही भुरळ पडणारे आवाहन साहिरच करू शकतो हे गाण्याच्या प्रत्येक ओळीत जाणवत राहाते.

जाती बहारें हैं उठती जवानियाँ,
तारोंके छाओंमें पहले कहानियाँ,
एक बार चल दिये गर तुझे पुकारके,
लौटकर न आएंगे क़ाफ़िले बहारके…
आजा अभी ज़िंदगी है जवाँ, सुन जा…

या गाण्याचा साधासरळ अर्थ तर सहज समजण्यासारखा आहे. पण गाण्यातील कवितेला, तिच्याशी समरसून पाहिले तर साहिर जीवनातले किती महत्त्वाचे सत्य प्रकट करतो आहे ते लक्षात येते.
अनेकदा अनेक प्रेमकथा या सुरू होण्याआधीच संपून जातात. तारुण्याचा धुंद अनुभव घ्यायचे राहूनच जाते. कधी कारण असते स्त्रीसुलभ संकोच… किंवा कधी पुरुषी अहंकार नाही तर आत्ममग्नपणा!
आयुष्य तर क्षणभंगुर आहेच पण तारुण्य त्याहून बिनभरोशाचे आणि क्षणिक आहे, हा संदेश महत्त्वाचा नाही का? साहिरने म्हटल्याप्रमाणे खरेच वसंतातले काफिले आता कधीच परत येणार नाहीत ना! ते परत येतच नसतात! मग प्रियकराला अगतिकतेने तिला सांगावे लागते, “आज राणी पूर्वीची प्रीत ती मागू नको.” आणि जर विलंब किंवा नकार जर तिच्या बाजूचा होता, तर मग तारुण्याचा बहर निघून गेलेल्या प्रियेला त्याला विनवावे लागते, “मधू मागशी माझ्या सख्या परी, मधू घटची रिकामे पडती घरी.”

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -