अनुराधा परब
भारताच्या पश्चिम किनारपट्टीचा भाग विशेषतः कोकण, कारवार, केरळ हा मादागास्कर बेटांशी कधीकाळी संलग्न होता, यावर किती जणांचा विश्वास बसेल? किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली २३० कोटी वर्षांपासून अस्तित्वात आहे, हे किती जणांना पटेल? परंतु या आणि अशा गोष्टी या सत्य आहेत. सत्य शेवटी पुराव्यांनिशी सिद्ध होत असते. त्यामुळे याला पुरावा आहे तो भौगोलिक उलथापालथींचा, घडामोडींचा, वेळोवेळी होत गेलेल्या नैसर्गिक बदलांचा. ज्यावर आजपर्यंत अनेक भू-वैज्ञानिकांनी शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास, संशोधन करून ठोस असे निष्कर्ष प्रकाशित केलेले आहेत. या निष्कर्षांचा खूप मोठा वाटा हा कोणत्याही प्रदेशातील संस्कृतीच्या अभ्यासामध्ये महत्त्वाचा ठरतो. कारण भौगोलिकतेशिवाय संस्कृती ही आकाराला येऊच शकत नाही. तिला तिचे ठाम असे प्रतल लागते, ज्यावर वसणारी, नांदणारी, विकसित होणारी जीवसृष्टी ही अनेकांगांनी संस्कृतीचे ताणेबाणे विणत असते. त्यामुळे सिंधुदुर्गाच्या संस्कृतीबंधाचा विचार करत असताना पश्चिम किनारपट्टीवर असलेल्या संपूर्ण प्रदेशाच्या भौगोलिकतेचा विचार हा अनिवार्य ठरतो.
विद्यमान भारतीय उपखंडामध्ये पाकिस्तान, म्यानमार, श्रीलंका व भारताचा समावेश होतो. उपखंडाचा बहुतांश भाग हा भारतानेच व्यापलेला आहे. हा संपूर्ण परिसर ६५ दशलक्ष वर्षांपूर्वी आताच्या अंटार्क्टिकाला जोडलेला होता आणि त्या अजस्र भूखंडाला वैज्ञानिकांनी गोंडवन असे नाव दिले. मध्य प्रदेशात तसेच नागपूर नजीकच्या परिसरात राहणाऱ्या गोंड या प्राचीन आदिवासी जमातीच्या नावावरून गोंडवन हे नाव देण्यात आले. आपल्याकडे महाराष्ट्रात सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्येही आदिवासी गोंड वसलेले होते. हा अजस्र खंड दक्षिण गोलार्धात होता. गोंडवनामध्ये आताचा अंटार्क्टिका, दक्षिण आफ्रिका, भारतीय उपखंड आणि विद्यमान दक्षिण अमेरिकेचा समावेश होता. त्यामुळे आजही एकमेकांपासून विलग झालेल्या या खंडांचा – सर्व प्रदेशांचा भूगर्भीय इतिहास मात्र एकसमानच आहे.
सुमारे ६५ दशलक्ष वर्षांपूर्वी भूगर्भातील हालचालींमुळे या गोंडवनाला भेगा पडत गेल्या आणि हे भूभाग एकमेकांपासून विलग होत होत भारतीय उपखंडाचा भाग आशिया खंडाला येऊन जोडले गेले. भारताची पूर्व किनारपट्टीची बाजू ही अंटार्क्टिकाला, तर पश्चिम किनारपट्टीची बाजू ही विद्यमान पूर्व आफ्रिकेला जोडलेली होती. मादागास्करच्या पूर्वेचा भाग आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पश्चिम किनारपट्टीचा भाग परस्परांशी संलग्न होता. भूगर्भीय हालचालींमुळे हे भाग तुटू लागले. त्यावेळी विद्यमान सिंधुदुर्गातील पश्चिमवाहिनी नद्याही मध्येच तुटल्या. या नद्यांचा पूर्वेकडचा भाग हा आज कोकणात आहे, तर पश्चिमेकडील भाग हा मादागास्करमध्ये आहे. याच विलगीकरणादरम्यान साधारण ५५ दशलक्ष वर्षांपूर्वी अरबी समुद्राची निर्मिती झाली.
मिड ओशनिक रिज अर्थात समुद्राच्या खालच्या मोठाल्या पर्वतरांगांतून ज्वालामुखीच्या उद्रेकाने या भूखंडाच्या विलगीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. ही प्रक्रिया साधारणतः एकरेषीय झाल्यानेच मादागास्करचा पूर्व किनारा भाग आणि कोकणाचा पश्चिम किनारा भाग हा एकमेकांना कधीकाळी जोडलेला असेल याची कल्पना विहंगनजरेने किंवा नकाशा पाहताना सहज येऊ शकते. ही भूगर्भीय प्रक्रिया संपूर्ण जगात “इंडिया-मादागास्कर सेशल्स सेपरेशन” या नावाने ओळखली जाते.
भारताच्या विद्यमान पश्चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकणात आपल्याला खाड्या दिसतात, तर पूर्व किनारपट्टीवर अनेक ठिकाणी नदीतून वाहून आलेल्या वाळू आणि मातीमुळे त्रिभूज प्रदेश तयार झालेला दिसतो. पश्चिम बंगालजवळचे सुंदरबन हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. पश्चिम किनारपट्टीवर कोकणाच्या बाजूस अशा गाळाच्या रचना पाहायला न मिळण्याचे कारण म्हणजे या नद्या भूप्रदेशासोबत मधूनच तुटून विलग झाल्यामुळे त्यांचा पश्चिमेकडचा भाग हा मादागास्करमध्ये राहिला, तर उगमाकडील भाग हा कोकणात राहिला. परिणामी, कोकणात आपल्याला खाड्यांची रचना पाहायला मिळते. किंबहुना म्हणूनच कोकणातील सर्व खाड्यांमधून अगदी नव्वदच्या दशकापर्यंत जलप्रवास केला जात होता.
आता गोष्ट कोकणच्या, खासकरून सिंधुदुर्गाच्या वयोमानाची, तर भूगोलामध्ये एखाद्या प्रदेशाचे वयोमान तिथे सापडणाऱ्या दगडाच्या वयावरून ठरत असते. बंगळूरु, चित्रदुर्ग, धारवाड किंवा गोव्यात अथवा प्रामुख्याने दक्षिण भारतात जो दगड सापडतो त्यास प्री केंब्रियन असे म्हणतात. भौगोलिक कालगणनेमध्ये प्री केंब्रियन म्हणजे पृथ्वीची निर्मिती झाल्यापासूनचा कालखंड होय. प्री केंब्रियन, त्यानंतर पॅलिओझोईक, मेसोझोईक आणि सिनोझोईक म्हणजे सध्याचा कालखंड अशा एकूण चार कालखंडामध्ये वर्गीकरण केले जाते. यातील अगदी सुरुवातीचा प्री केंब्रियन म्हणजे या भूतलावर सजीवसृष्टी निर्माण होण्याच्या आधीचा कालखंड. कोकणामध्ये विद्यमान सिंधुदुर्गातील कणकवली येथील दगड या वयोमान निश्चितीच्या शास्त्रीय कसोटीसाठी निवडण्यात आला. मिड ओशनिक रिजची प्रक्रिया आणि कणकवली येथील दगडाच्या कालनिश्चितीविषयी बोलताना पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या भूगर्भशास्त्र विभागातील ज्येष्ठ संशोधक, तज्ज्ञ डॉ. रेमंड दुरईस्वामी म्हणतात, १८१६ साली प्रसिद्ध भूगर्भतज्ज्ञ क्रॉफर्ड यांनी युरेनियम वैज्ञानिक कसोटीच्या आधारे कणकवली येथील प्री केंब्रियन दगडाची कालनिश्चिती केली. ते वय होते तब्बल २६० कोटी वर्षे. अशा प्रकारे अंटार्क्टिकावरचा दगड आणि कणकवली येथे आढळणाऱ्या दगडाचे आयुर्मान सारखेच आहे. याच दगडाला भूगर्भशास्त्रामध्ये पेनिन्सुलर नाईस
(Peninsular gneiss) म्हटले जाते. थोडक्यात, निर्जीव दगडही जेव्हा बोलू लागतात, त्यावेळी संस्कृतीचे विविध स्तर हे हळूहळू आपापले रूपवैभव उलगडू लागतात. त्याविषयी पुढल्या भागात.
(लेिखका ज्येष्ठ पत्रकार, प्राचीन भारतीय संस्कृती
अभ्यासक आहेत.)
[email protected]