
मुंबई : गेल्या ११ वर्षांपासून मुंबईतील महापालिका मुख्यालयासमोर तसेच शिवाजी पार्क येथील पालिकेची क्रीडा भवन बंद आहेत. ही क्रीडा भवन पुन्हा सुरू करण्यासाठी सन २०१७ मध्ये विधी समितीत निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार यावेळी क्रीडा भवनासाठी नियमावली तयार करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. मात्र असे असूनही पालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत असून क्रीडा भवन सुरू करण्यासाठी प्रशासनाची कोणतीही हालचाल दिसत नसल्याने महापौर किशोरी पेडणेकर यांनी पालिका आयुक्तांना पत्र पाठवून आपली नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबई पालिकेतील कर्मचाऱ्यांच्या क्रीडा गुणांना उभारी देण्यासाठी पालिका प्रशासनाने १९२६ मध्ये क्रीडा भवनाची स्थापना केली तर २०१० मध्ये क्रीडा भवनाच्या कार्यकारिणीमधील सदस्यांवर झालेल्या गैरकारभाराच्या आरोपानंतर क्रीडा भवन बंद करण्यात आले होते. मात्र ते उघडण्यासाठी २०१७ मध्ये विधी समिती व पालिका सभागृहात क्रीडा भवन सुरू करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. यावेळी नवीन नियमावली तयार करण्याचे नगरसेवकांनी सुचवूनही गेल्या चार वर्षांत नियमावली तयार झालेली नाही. याबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांनी पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना पत्र लिहून प्रशासनाच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.