Sunday, July 14, 2024
Homeताज्या घडामोडीराज्यात २०२१ मध्ये कौशल्य विकास विभागामार्फत २.१९ लाख जणांना रोजगार

राज्यात २०२१ मध्ये कौशल्य विकास विभागामार्फत २.१९ लाख जणांना रोजगार

नवाब मलिक यांची माहिती

मुंबई  : कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यामध्ये २०२१ या वर्षामध्ये २ लाख १९ हजार १५६ उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. डिसेंबर  २०२१ या एकाच महिन्यात ४५ हजार १८२ बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात यश आले. डिसेंबर २०२१ मध्ये विभागामार्फत राबविण्यात आलेल्या महारोजगार मेळाव्यास उत्तम प्रतिसाद आणि यश मिळाले. महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरीइच्छूक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येतो, असे त्यांनी सांगितले.

मलिक म्हणाले की, बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने  https://rojgar.mahaswayam.gov.in  हे वेबपोर्टल सुरू केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहीतीसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करून त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. नोकरीइच्छूक उमेदवारांनी या वेबपोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. विभागामार्फत जिल्ह्यांमध्ये वेळोवेळी ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचेही आयोजन करण्यात येते.

मलिक म्हणाले की, डिसेंबर २०२१ मध्ये विभागाकडे ६९ हजार ०५२ इतक्या नोकरीइच्छूक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यात मुंबई विभागात ११ हजार ३४८, नाशिक विभागात १० हजार ८८९, पुणे विभागात १३ हजार ५३९, औरंगाबाद विभागात सर्वाधिक १८ हजार ३५७, अमरावती विभागात ११ हजार ६५८ तर नागपूर विभागात ३ हजार २६१ बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -