
नाशिक रोड : नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या दोन कैद्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास कारागृहाचे अधीक्षक यांची साप्ताहिक संचारफेरी सुरू असताना शिक्षाबंदी विजयकुमार आनंदकुमार रॉय याने अधीक्षकांना अरेरावी करीत “तुमे मेरे को तकलीफ क्यों दे रहे हो? मेरे को शांती से यही पे रहने दो,” असे म्हणत त्याने त्याच्यासोबत खिशात लपवून आणलेल्या लोखंडी पत्र्याच्या तुकड्याने स्वत:च्या डाव्या हाताने सपासप वार करून जखम करून घेतले. तसेच अंगावरील सदरा फाडून त्याने स्वत:च्या बरगडीलादेखील लोखंडी पत्र्याच्या सहाय्याने जखम करून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना कारागृहातील दवाखाना विभागाच्या प्रवेशद्वाराजवळ घडली. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात विजयकुमारविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसर्या घटनेत न्यायाधीन बंदी सागर राहुल जाधव (२३) हा बॅरेक नंबर ४समोरील कडुनिंबाच्या झाडावर चढला. त्याने दोरी बांधून आत्महत्या करीन, अशी धमकी देऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात सागर जाधव विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे