
बीसीसीआयकडे आयपीएल आयोजित करण्याचे दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे १० संघांसह होम-अवे मॅच फॉरमॅटमध्ये सामने खेळणे. जे स्टेडियम संघाच्या मालकीचे असेल तेथेच सामने झाले पाहिजेत. बीसीसीआयसाठी आणखी एक मार्ग म्हणजे हंगामातील संपूर्ण सामने मुंबईतील तीन स्टेडियममध्ये (वानखेडे, सीसीआय आणि डीवाय पाटील स्टेडियम) आयोजित करणे. जिथे सर्व संघ आपले सर्व सामने खेळतील.
यूएई हा बीसीसीआयचा शेवटचा पर्याय आहे
बीसीसीआयकडे शेवटचा पर्याय म्हणजे सलग तिसऱ्या वर्षी आयपीएल यूएईमध्ये आयोजित करणे. जिथे त्यांनी खेळाडूंच्या पूर्ण सुरक्षेसह स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले आहे. मात्र या पर्यायावर सध्या कोणतीही चर्चा झालेली नाही.
स्पर्धेच्या वेळापत्रकात बदल
बीसीसीआय कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर वेळापत्रकात बदल करून डबल हेडर सामन्यांची संख्या कमी करण्याचा विचार करत आहे. पूर्व नियोजित वेळापत्रकानुसार, आयपीएल २०२२ स्पर्धा २ एप्रिलपासून सुरू होणार आहे. अशा स्थितीत स्पर्धेच्या सुरुवातीची तारीख एक आठवडा मागे ढकलली जाऊ शकते. अशा स्थितीत ही स्पर्धा २५ मार्चपासून सुरू होऊ शकते. मात्र कोरोनाची परिस्थिती पाहून या सर्व योजना अमलात आणल्या जातील.
आयपीएल २०२२साठी खेळाडूंच्या लिलावाच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. ते कधी आणि कुठे होणार, हे स्पष्ट नाही. मात्र करोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने राज्य सरकार विविध प्रकारचे निर्बंध लादत आहेत. अशा परिस्थितीत लिलावाचे ठिकाणही बदलू शकते.