तालुक्यातील कुडूस ग्रामपंचायतीच्या हद्दीत कोकाकोला ही शितपेय बनवणारी कंपनी असून या कंपनीत स्थानिक भुमिपूत्र कामगार गेल्या अनेक वर्षांपासून काम करीत आहेत.कंपनी प्रशासन व ठेकेदार यांचा मनमानी कारभार सुरु असून ठेकेदाराने कामगारांचे भविष्य निर्वाह निधीचे पैसे भरलेले नाहीत. या व इतर मागण्यांकडे कंपनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवार ५ जानेवारी पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मात्र दुसऱ्या दिवशीही कंपनी प्रशासन किंवा कामगार आयुक्त प्रशासन या आंदोलनाकडे फिरकले नाहीत.त्यामुळे कंपनी प्रशासनाचा निषेध नोंदवण्यासाठी शुक्रवारी सकाळी कामगारांनी आंदोलनस्थळीच मुंडन करून प्रशासनाचा निषेध नोंदवला.
दरम्यान,आज दुपारी निवासी नायब तहसीलदार सुनील लहांगे यांनी कोकाकोला कंपनीचे व्यवस्थापक रूपेश परदेशी, संदीप वेखंडे, ठेकेदार धनंजय चौधरी, उप सहाय्यक आयुक्त दिपक बोडके,पोलिस निरीक्षक दशरथ पाटील, संघटनेचे नेते जितेश पाटील, रविंद्र मेणे व कामगार प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक बोलावली होती. या बैठकीत मागण्यांबाबत कामगारांत एकमत न झाल्याने बोलणी फिस्कटली त्यामुळे आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे.