Thursday, October 10, 2024
Homeताज्या घडामोडीपंतप्रधान मोदींच्या सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी ठेवणाऱ्यांवर कडक कारवाई करा

पंतप्रधान मोदींच्या सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी ठेवणाऱ्यांवर कडक कारवाई करा

भाजपा वसई विरार जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांची मागणी

पालघर  : पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेत जाणीवपूर्वक त्रुटी ठेवणाऱ्या सर्व संबंधितांवर कडक कारवाई झाली पाहिजे,अशी मागणी भाजपा वसई विरार जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांनी केली आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी ठेवण्याच्या षडयंत्राची सखोल चौकशी व्हावी.तसेच पंतप्रधानांच्या दौऱ्यावेळी पंजाबमध्ये जे काही घडले ते अत्यंत गंभीर असून या घटनेचा वसई-विरार जिल्हा भाजप तीव्र निषेध करत आहे. या घटनेची राष्ट्रपतींनी गंभीर दखल घेतली पाहिजे.

पक्षीय द्वेषापोटी देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेशी घातक खेळ आजवर कोणीच केला नव्हता. पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेची व्यूहरचना व कार्यवाही केंद्र व राज्य सरकारच्या संबंधित यंत्रणा परस्परांशी समन्वय ठेवून आखत असतात. पंतप्रधानांच्या सुरक्षा यंत्रणेला राज्य सरकारच्या पोलीस यंत्रणेकडून सहकार्य मिळणे अपेक्षित असते. मात्र पंजाबातील घटनाक्रम पाहिला तर असे लक्षात येते की, पंतप्रधानांच्या मार्गावर जाणीवपूर्वक आंदोलनाला परवानगी दिली गेली. आंदोलकांमुळे पद्धतशीरपणे रस्ता बंद होईल, याची दक्षता घेतली गेली. जेथे हे घडले तेथून पाकिस्तानची सीमा अतिशय जवळ आहे. पंतप्रधानांचा जीव जाणीवपूर्वक धोक्यात आणण्यासाठी केली गेलेली ही खेळी होती.

पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील चुका या देशाच्या दृष्टीने अत्यंत नामुष्कीची गोष्ट आहे. सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीला जबाबदार असणाऱ्या सर्वांवर कडक कारवाई झाली पाहिजे. या घटनेसंदर्भात कॉंग्रेस नेत्यांनी बेजबाबदार प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.पंतप्रधान,हा देशाचा असतो तो कोण्या एका पक्षाचा नसतो.एवढी घटना घडूनही मुख्यमंत्री प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होत नाहीत,ही लाजीरवाणी गोष्ट आहे.खालच्या पातळीचे राजकारण करणाऱ्या शक्तींना जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही,असे जिल्हाध्यक्ष नाईक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -